सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी

07 Jun 2020 By श्री. रुपेश चौधरी
1786 8 Comments
post-1

श्री. रुपेश चौधरी

वॉरन बफेट हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मला सुद्धा इतर लोकांप्रमाणे या व्यक्तिमत्वाच विलक्षण आकर्षण फार पूर्वीपासूनच होत. पण ते आकर्षण ही व्यक्ती जगातील श्रीमंत व्यक्ती आहे म्हणून कधीच नव्हत, तर कमावलेल्या संपत्तीचा उपभोग न घेता ते दान करण्याच्या त्याच्या वृत्तीच आणि त्याच्या अतिशय साध्या राहणीमानाच होतं. मी वॉरन बफेट यांच्या बऱ्याच मुलाखती आजवर पाहिल्या आहेत तसेच त्यांच्यावरील अनेक लेख सुद्धा वाचले आहेत. पण  त्यांचं लहानपण कस होतं, त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे संस्कार झाले तसेच त्यांचे आतापर्यंतचे खासगी आयुष्य कसे होते याबद्दल वाचण्याची माझी खूप इच्छा होती. सध्याच्या परिस्थितीत वाचनासाठी बऱ्यापैकी वेळ असल्याने मी वॉरन बफेट यांच्यावरील पुस्तकांचा शोध घेऊ लागलो आणि त्या वेळेस अतुल कहाते यांचं हे पुस्तक माझ्या हाती लागलं. 

वॉरन बफेट यांच्या खासगी आणि व्यावसायिक जीवनातून आपल्याला शिकण्यासारखं बरच काही आहे. त्यातील मला आवडलेल्या गोष्टी मी इथे नमूद करू इच्छितो.

१. मला वैयक्तिकरित्या नेहमी वाटतं आपल्या शिक्षण पद्धती मध्ये बचत आणि गुंतवणुक हे दोन आयुष्यात सर्वात महत्वाचे असणारे विषय लहानणापासूनच अभ्यासक्रमात आणून विद्यार्थ्यांना त्यांचे बाळकडू पाजले पाहीजेत. ज्या वयात आपल्याला गुंतवणूक या शब्दाचा अर्थ देखील माहीत नसतो अशा ११ वर्षांच्या वयात वॉरन बफेट यांनी स्वतः कमावलेल्या पैशांतून पहिली शेअर्स मधील आपली यशस्वी गुंतवणूक केली. तरी देखील मला गुंतवणूक करण्यासाठी फार उशीर झाला असं वॉरन बफेट म्हणतात. 

२. प्रत्येकाला आयुष्यात गुरूची गरज असते. वॉरन बफेट यांच्या आयुष्यात देखील त्यांना अगदी लहान वयातच बेंजामिन ग्रॅहॅम नावाचा गुरु भेटला. ग्रॅहॅम यांच्या "व्हॅल्यू इंव्हेस्टींग" या तत्त्वाचा वापर करूनच वॉरन बफेट यांनी त्यांची आज वरची सगळी गुंतवणूक केली आहे. 

३. वाचन हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात क्रांती घेऊन येतं याला वॉरन बफेट देखील अपवाद नाहीत. बेंजामिन ग्रॅहॅम यांच्या "Security Analysis" आणि  "The Intelligent Investor" या पुस्तकांनी वॉरन बफेट बरेच भारावून गेले होते.  कोणत्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी यासाठी आजही वॉरन बफेट सतत वाचन करत असतात. तसेच बफेट यांना मोठमोठ्या व्यक्तींची आत्मचरित्र देखील वाचायला आवडतात. त्यातून मला खूप प्रोत्साहन मिळतं असं ते म्हणतात. 

४. बऱ्याच वेळेस पालक आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त संपत्ती कमावून त्यांचं भविष्य सुखकर करण्याचा प्रयत्न करतात. पण हे साफ चुकीचं आहे. वॉरन बफेट म्हणतात तुम्ही तुमच्या मुलांना तितकेच पैसे द्या जेणेकरून ते काहीतरी करतील पण एवढे देऊ नका की ते काहीच करणार नाहीत. ( You should provide them enough money that they would feel they could do something but not so much that they could do nothing). त्याचप्रकारे आपण कमावलेली संपत्ती ही समाजाची आहे आणि ती काही काळासाठी समाजाने आपल्याकडे सुपूर्द केलेली असते. ती पिढ्यान् पिढ्या आपल्याकडे न ठेवता पुन्हा समाजाकडे पोहोचवली पाहिजे जेणेकरून समाजाचा फायदा होईल असे बफेट यांचे उच्च विचार आहेत. 

५. वॉरन बफेट व्यवसायात यशस्वी ठरत होते, पण त्याचवेळेस कौटुंबिक जीवनात मात्र ते सपशेल अयशस्वी होत होते. वेळ आणि लक्ष न दिल्यामुळे त्यांची पत्नी सुझी त्यांच्यापासून दूर होतं गेली. व्यवसायाबरोबरच कौटुंबिक जीवन देखील तितकच महत्वाचं असतं हे आपल्यासाठी इथे शिकण्यासारखं आहे.

६. बर्कशायर हाथवे हा कापड निर्मिती व्यवसाय बंद करणे असो किंवा बऱ्याच शेअर्स मधील गुंतवणूक काढून घेणे असो असे बरेच कठोर पण व्यावहारिक निर्णय वॉरन बफेट यांनी आपल्या व्यावसायिक जीवनात अनेकदा घेतले. नुकसानीत असलेला व्यवसाय विनाकारण सुरू ठेवण्यातून कोणाचच भलं होतं नसतं हे ते ठामपणे म्हणत असत. यातून व्यवसायात भावना आणून चालत नाहीत आणि निर्णय हे व्यावहारिक स्वरूपाचेच घ्यावे लागतात हे आपल्याला कळून येतं. 

७. वॉरन बफेट यांचं मुख्यालय अतिशय साध आणि छोटेखानी असल्याने बरेच जण त्यांना नेहमी या गोष्टीबद्दल हटकत असत.  गरजेपुरतेच कर्मचारी असलेली छोटे खानी कंपनी असली की सगळ्याच कर्मचाऱ्यांना आपला वेळ आपल्याच सहकाऱ्यांच व्यवस्थापन करण्यात घालवण्यापेक्षा प्रत्यक्ष व्यवसायामधील कामे करण्यात वापरता येतो असं बफेट यांचं अत्यंत प्रामाणिक मत होतं. बरेच व्यावसायिक इतरांना दाखवण्यासाठी किंवा मोठेपणा मिरवण्यासाठी  म्हणून मोठं कार्यालय घेतात आणि लवकरच त्याचा स्थिर खर्च (fixed cost)   न परवडल्याने त्यांना व्यवसायामध्ये तोटा सहन करावा लागतो किंवा व्यवसाय बंद करण्याची वेळ येते. हे टाळण्यासाठी आपलं कार्यालय गरजे इतकंच मोठं आणि साधं ठेवाव हा धडा आपल्याला मिळतो.

८. डॉटकॉम च्या उदयाच्या वेळेस सर्व गुंतवणूकदार संगणक आणि दूरसंचार या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असताना बफेट मात्र आपल्या नेहमीच्या शैलीत च इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत होते. त्याचं म्हणणं एकदम सोपं होतं ज्या क्षेत्रातलं मला कळत नाही त्या क्षेत्रात मी गुंतवणूक करणार नाही. ज्या क्षेत्रातलं आपल्याला ज्ञान नाही त्या क्षेत्रात आपण उतरू नये किंवा त्या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करूनच आपण त्या क्षेत्रात उतरावं ही आपल्यासाठी शिकवण आहे.

९. वॉरन बफेट यांचा कडून काही चुकीचे निर्णय देखील घेतले गेले ज्यामुळे त्यांना खूप तोटा देखील सहन करावा लागला. पण त्यामुळे ते तिथेच थांबले नाहीत तर त्या चुकांमधून शिकून ते पुढे जात राहिले. 

१०. वॉरन बफेट यांच्या सगळ्याच गुंतवणूक या दीर्घ कालावधीसाठी  असतात. या मधून व्यवसाया मध्ये संयम खूप महत्वाचा असतो ही जणू शिकवणच ते आपल्याला देतात. 

काही जणांना खेळण्याची आवड असते तर काहींना अभ्यासाची ओढ, काहींना संगीताची गोडी तर काहींना अभिनयाच वेड त्याचप्रमाणे माझ्या मते वॉरन बफेट यांना आपल्या ज्ञानाचा वापर करून पैशांची गुंतवणूक करणे आणि ती वाढत असताना पाहणे यामध्ये आनंद मिळतो. पण त्या पैशांचा उपभोग न घेता त्यातील अधिकाधिक पैसे समाजासाठी दान करणे याला ते आपलं कर्तव्य समजतात. वॉरन बफेट यांच्यामधील  कलागुणांमुळे मला वरील शीर्षक "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" अगदी योग्य आणि साजेस वाटलं.आपलं आयुष्यातल यश कसं मोजाव याची व्याख्या अतिशय उद्बोधक पणे वॉरन बफेट यांनी सांगितली आहे. त्यानेच मी इथे शेवट करतो -

"आपल्याला ज्या सगळ्या लोकांनी आपल्यावर प्रेम करावं असं वाटतं, त्यापैकी जास्तीत जास्त लोकांनी खरंच आपल्यावर प्रेम केलं तर आपलं आयुष्य यशस्वी समजावं."

अशा या पैशांवर प्रेम करणाऱ्या पण पैशांची अजिबात आसक्ती न बाळगणाऱ्या अवलियाला आणि त्याच्या ज्ञानप्रतिभेला माझा त्रिवार प्रणाम!

Share This:

प्रतिक्रिया

संतोष बोकडिया on 11 Nov 2021 , 11:04PM

उत्तम प्रेरणादायी लेख

भास्कर भामरे on 11 Dec 2020 , 9:16PM

खूपच प्रेरणादायी व अप्रतिम लेख.

pralhad on 07 Nov 2020 , 5:24PM

खूप सुंदर माहिती

Varsha p borule on 17 Sep 2020 , 9:30PM

inspiring

Dhanaji Mane on 29 Jun 2020 , 4:12PM

खूपच प्रेरणादायी आहे !👌

Supriya Khedekar on 17 Jun 2020 , 5:54PM

Very nice article

योगेश प्रभाकर on 08 Jun 2020 , 10:52PM

खूपच सुंदर माहिती दिली आहे...😊😊😊

Ketan Bhandari on 07 Jun 2020 , 11:46AM

खूप छान लेख , अगदी मार्मिक शब्दांत मांडणी....

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...