सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सहधारकासह गृहकर्ज घेणे अधिक फायदेशीर

19 May 2021 By श्री. उदय काशिनाथ पिंगळे
471 1 Comments
post-1

श्री. उदय काशिनाथ पिंगळे

घर - प्राथमिक गरज ! मात्र मालमत्तेच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ यामुळे मनासारखे घर घेण्यासाठी आता सर्वानाच गृहकर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. जेव्हा अन्य सदस्यासह एखादे कर्ज घेतले जाते तेव्हा ती व्यक्ती सहकर्जदार होते. हा एक कायदेशीर करार असून मूळ कर्जदाराइतकीच त्याचीही जबाबदारी यामुळे निश्चित होते. सहकर्जधारकामुळे अधिक कर्ज मिळण्याची शक्यता वाढण्यासह इतर अनेक फायदे होतात, ते कोणते हे समजून घेऊयात. जरी एखाद्या व्यक्तीस त्याच्या पात्रतेनुसार गृहकर्ज मिळवण्यासाठी सहकर्जदाराची आवश्यकता नसली तरी असे कर्ज सहधारकासह घेणे अधिक किफायतशीर ठरते.

आपल्या स्वप्नातील घर तंतोतंत साकारणे ही साधी गोष्ट नाही अनेकदा त्यासाठी बरीच तडजोड नाईलाजाने करावी लागते. ही तडजोड, घराचे स्थान, आकार, अन्य सोयीसुविधा, अंतर्गत सजावट, पार्किंगची सोय अशा स्वरूपात असू शकते. सहकर्जदार कमावती व्यक्ती असेल तर ते अधिक सोईचे होते. ही व्यक्ती कर्जदाराचा जोडीदार (पति /पत्नी) त्याच्या जवळच्या नात्यातील व्यक्ती म्हणजे आई / वडील / बहीण / भाऊ / मुलगा / मुलगी असावी लागते त्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. गृहकर्जदार आणि घराची मालकी या दोन वेगवेगवेगळ्या गोष्टी आहेत. कर्जदारास वाटले तर तो घराच्या मालकी हक्कात सहमालक म्हणून कोणासही नोंदवून स्वतः कर्ज घेऊ शकतो. सर्वसाधारण सोय म्हणून बहुदा असे घर आणि कर्ज पती पत्नी यांच्या नावावर असते त्यातही कर्ज व मालकी हक्क वेगवेगळे असू शकतात. आईवडील त्यांची मुले भाऊ बहीण यांच्यासह कर्ज घेताना त्यासोबत मालकीहक्क घ्यायचा की नाही हे भविष्यातील वाद टाळण्यासाठी आधीच ठरवून घ्यावे. कर्ज मिळवण्याच्या दृष्टीने कर्जदाराची मालमत्तेवर मालकी हवीच असे नाही तर कर्ज परतफेड करण्याची क्षमता विचारात घेतली जाते. 

सहकर्जधारकाच्या मालकीसह गृहकर्ज घेण्याचे फायदे :-

★ यामुळे जास्त मोठ्या रकमेचे कर्ज मिळू शकते त्यामुळे घरासंबंधित ज्या ज्या तडजोड कराव्या लागतात त्या पासून मुक्तता मिळते. आपल्या मनाप्रमाणे अंतर्गत सजावट करता येते. कर्जाची विभागणी दोघांवर झाल्याने त्याचा भार काही प्रमाणात सुसह्य होतो.

★ कर्ज घेणारी व्यक्ती स्त्री असेल तर अनेक बँका, गृहकर्ज वित्तसंस्था कर्जाच्या अर्जावर प्रक्रियाशुक्ल कमी घेतात तर काहीजण अजिबात घेत नाहीत. हे प्रक्रिया शुल्क एका विशिष्ट मर्यादेत अथवा कर्ज रकमेच्या 1% पर्यत असू शकते. त्याचप्रमाणे कर्जादरावरही किंचित (0.1%) व्याजदर सवलत मिळू शकते. याचा फायदा दोन्ही कर्जदारास होतो.

★ मालमत्तेची नोंदणी करताना महिलांना/ महिला सहधारकाना अनेक राज्यांनी नोंदणी शुल्कातून सवलती दिलेल्या असून त्यामुळेही एकूण खर्चात बचत होते. बांधकाम क्षेत्राला दिलासा म्हणून सध्या 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2020 या काळासाठी महाराष्ट्र शासनाने नोंदणी शुल्क 2% तर 1 जानेवारी  ते 31 मार्च 2021 या काळासाठी 3% असे स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी कमी केले आहे, जे नियमित 5% आहे. या वर्षाअखेरपर्यंत घर खरेदी करणाऱ्या घरांचे नोंदणी शुल्क विकासक भरतील असे त्यांच्या नरेडको सारख्या संघटनेने जाहीर केले असून त्यामुळे घर या कालावधीत घर घेणाऱ्या ग्राहकांना मुद्रांक शुल्क कदाचित भरावे लागणार नाही.

★ आयकरातून मिळणारी भरघोस सूट हा सर्वात मोठा फायदा, तो सर्व कर्जदारांना वेगळा घेता येतो. जेथे मालमत्तेचा हिस्सा करारात नमूद केला नसेल तेथे तो कायद्याच्या दृष्टीने 50% आहे असे समजण्यात येते तर जेथे हिस्सेदारी याहून वेगळ्या प्रमाणात मान्य केली आहे त्यास त्याप्रमाणे कर्जहप्ता मुद्दल  आयकर कायदा कलम 80/ C प्रमाणे 1लाख 50 हजार तर 24/B नुसार 2 लाख रुपयांपर्यंत व्याज याची वरील मर्यादेत प्रत्येकाला निव्वळ उत्पन्नातून सूट मिळते. त्यामुळे मोठी करबचत होऊन एकाच घराच्या मालकीचा दोघांना म्हणजेच कुटुंबाला दुहेरी फायदा होतो. उदाहरणादाखल 50% सहमालक असलेले एकाच घराचे पतिपत्नी यांनी 50 लाख रुपयांचे 8% व्याजाचे, 20 वर्षात फेडण्याचे गृहकर्ज घेतले असून, या दोघांना पाहिल्या वर्षी उच्चदराने (30%)  कर द्यावा लागत आहे. अशी परिस्थिती असल्यास दोघांचा मिळून जवळपास 59 हजार रुपयांचा कर पहिल्या वर्षी वाचतो. या आणि पुढील काळात दोघांना मिळणाऱ्या करबचतीचा दीर्घकाळात मोठा फायदा होतो.

★ हे घर आपलेअसून आपल्या मालकीचे आहे याचे मानसिक समाधान धारकासह सहधारकाला मिळते याची किंमत मूल्यात करता येणे अशक्य आहे. 

सहधारकासह कर्ज घेताना हे लक्षात ठेवा.

★ घर घेताना शक्यतो बांधकाम पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळवलेल्या मालमत्तेस प्राधान्य द्यावे, यास जीएसटी लागत नाही. त्यानंतर रेरा नोंदणीकृत जवळपास पूर्णत्वास आलेल्या मालमत्तांचा विचार करावा. भोगवटा प्रमाणपत्र  मिळवण्यासाठी, सिडको आणि महानगरपालिका यांचे निकष वेगवेगळे आहेत, अशीच तफावत अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेत असू शकते. विकासकाने यासंबंधीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक फी भरली असल्याची खात्री करून घ्यावी, रेराच्या संकेतस्थळावरून संबंधीत प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती करून घ्यावी. अधिक खबरदारीच्या दृष्टीने बांधकाम सुरू होणाऱ्या अथवा अर्धवट असलेल्या प्रकल्पाचा विचार करू नये. 

★ सहधारकासह गृहकर्ज घेताना त्याच्या परतफेडीचा कालावधी ठरवताना ज्याचे वय सर्वाधिक आहे त्याच्या वयाचा विचार करून कालावधी निश्चित केला जातो. त्यामुळेच कर्जदारातील व्यक्तीमध्ये जास्त वयाची व्यक्ती असेल तर जास्त दीर्घ मुदतीचे कर्ज मिळण्यात अडचणी येतात. 

★ कर्जाची परतफेड ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी असते त्यामुळे एका धारकाने कोणत्याही कारणाने कर्ज न फेडल्यास ते फेडण्याची जबाबदारी आपोआपच दुसऱ्या धारकावर येते. कोणत्याही कारणांनी सहधारकाशी संबंध बिघडल्यास, पतिपत्नीनी घटस्फोट घेतल्यास किंवा एखाद्या धारकाचा मृत्यू झाल्यास कर्जफेड टाळता येत नाही. 

★ कोणतेही कर्ज सहधारकासह मिळवण्यासाठी आपली बाजू बळकट करण्याच्या दृष्टीने सर्व धारकाचा पतदर्जा तपासणे, त्याची ओळख व पत्ता सिद्ध करणारी पॅन आधार सारखी कागदपत्रे, विवाह प्रमाणपत्र, पगारपत्रक/ मागील तीन वर्षांची आयकर विवरणपत्रे, फोटो यासारख्या कागदपत्रांची पूर्वतयारी करून ठेवल्यास आणि अभ्यास करून थोडीशी तुलनात्मक माहिती मिळवल्यास, सुलभ जलद कर्ज मिळू शकते.


********************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://bit.ly/2EP0cPm

Share This:

प्रतिक्रिया

Bali sonawale on 23 Aug 2021 , 7:22PM

yes

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...