सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुलांसाठी गुंतवणूक करायचीय ?

13 Jul 2021 By श्री. उदय काशिनाथ पिंगळे
508 1 Comments
post-1

श्री. उदय काशिनाथ पिंगळे

सुरक्षितता, चांगला उतारा आणि रोकड सुलभता असणारी तसेच जोडीला करसवलतही देणारी योजना म्हणजे चांगली योजना असे समजले जाते. अनेक प्रकारच्या योजना सरकार, बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या, म्युच्युअल फंडाच्या एसेट मॅनेजमेंट कंपन्या यांनी बाजारात आणल्या आहेत. वरील सर्व अपेक्षा पूर्ण केल्या जातील अशी कोणतीही एक योजना नाही. छोटे विभक्त कुटुंब, चलनवाढीचा चढता दर तसेच शिक्षणावरील खर्चात दिवसेंदिवस होणारी वाढ यामुळे अनेकांना मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने काहीतरी भरीव तरतूद आधीपासूनच करावी असे कायम वाटत राहाते. लोकांच्या या मानसिकतेचा विमा कंपन्या पुरेपूर फायदा घेत असून मुलांच्या कल्याणासाठी म्हणून खास योजना त्यांनी बाजारात आणल्या आहेत. या योजना त्यांच्या 2/3 योजनांची सरमिसळ असून त्यातून मिळणारा उतारा हा 7% च्या आसपास आहे. योजना काळात पॉलिसी धारकाचे बरेवाईट झाल्यास यातील करारात नमूद केलेले संरक्षण यातून मिळते म्हणून त्याला विमा योजना म्हणायचे. तेव्हा अशा प्रकारच्या योजना या फारश्या आकर्षक नाहीत. माहीत असलेले मोजके पर्याय, एजंटचे नेटवर्क आणि त्यांनी केलेले भावनिक आवाहन यामुळे गुंतवणूकदार आशा योजना खरेदी करीत आहेत. यामुळे कोणती योजना अधिक चांगली, याबाबत इतरांच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून अनेक लोक संभ्रमात आहेत. केवळ मुलींसाठी असलेली सुकन्या समृद्धी योजना ही एकमेव सरकारी योजना असून सध्या त्यावर 8.5℅ एवढा वार्षिक उतारा मिळतो. ही योजना फक्त 10 वर्षांखालील मुलींसाठी असल्याचे तसेच यातील रक्कम फक्त मुलीस मिळत असल्याने त्याचा फायदा मर्यादित लोकच घेऊ शकतात.


मुलांच्या कल्याणासाठी कोणत्याही योजनेत गुंतवणूक करताना सर्वसाधारणपणे --

1. उच्च शिक्षणाचा खर्च: कारण शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. कर्जाच्या सोयी उपलब्ध असल्या तरी सर्वांचा कल हा काहीही करून शिक्षणास पैसे कमी पडू नयेत असा असतो. अधिक महागडे शिक्षण म्हणजे अधिक चांगले शिक्षण असा सर्वसाधारण कल आहे.

2. लग्न: लग्न समारंभ अविस्मरणीय व्हावा अशी अनेकांची इच्छा असते. विविध मालिका, चित्रपट यातील भव्यदिव्य लग्न समारंभ सर्वांना असा खर्च केला पाहिजे असे वाटण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे यावर अधिकाधिक खर्च चढाओढीने केला जात आहे.

3. घर घेण्यासाठी अंशतः मदत: घरांच्या वाढत्या किमतीमुळे नव्याने विकसित होत असलेल्या शहरातही घर घेणे परवडत नाही. जरी घर घेण्यासाठी कर्जाची सोय उपलब्ध असली तरी त्यातील किमान गरजेच्या गोष्टी घेण्यासही बरीच रक्कम लागते यासाठी काही मदत व्हावी असा यामागील हेतू आहे.

4. व्यवसायासाठी भांडवल : मुलांनी काही व्यवसाय करायचा ठरवल्यास त्यासाठी लागणाऱ्या संभाव्य  भांडवलाची गरज यातून भागवली जाईल असे पालकांना वाटते.

सर्वसाधारणपणे मुलाचे पालक गुंतवणूक करताना वरील गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतात. त्यापूर्वी पालकांनी स्वतःचा पुरेसा मुदत विमा (वार्षिक उत्पन्नाच्या 20 पट) आणि आरोग्य विमा (वार्षिक उत्पन्नाच्या 2/3 पट)  काढणे जरुरी आहे. जीवन विमा योजनेतून आपल्याला काय मिळेल यापेक्षा कदाचितआपल्या अनुपस्थितीत आपले कुटुंब, आहे हाच जीवनस्तर कसा सांभाळू शकेल? हे महत्त्वाचे आहे. यानंतरच उपलब्ध असलेल्या विविध  पर्यायांचा मुलांसाठी ठरवलेल्या वरील उद्दिष्टांसाठी कसा वापर करता येईल ते पाहुयात.

1. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF):16 आर्थिक वर्षांचे हे खाते पोस्ट किंवा बँकेत काढता येते. ते स्वतः च्या किंवा अज्ञान पाल्याच्या नावे काढता येईल. यात किमान ₹500/- ते ₹1.5 लाख रुपये दरवर्षी गुंतवणूक करता येत असून हे पैसे सरकार वापरात असल्याने 100% सुरक्षित आहेत. यातील गुंतवणूकीवर 8% करमुक्त व्याज मिळते. यावर आयकर अधिनियम 80/सी खाली करसवलत मिळत असली तरी ती सवलत अन्य गुंतवणुकीतून घेऊन जास्तीतजास्त रक्कम या योजनेत जमा करावी. यात सातव्या आर्थिक वर्षांपासून दरवर्षी एकदा कोणत्याही कारणासाठी अंशतः रक्कम काढता येत असल्याने गरजेनुसार त्याचा आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी वापर करता येईल. या खात्याची मुदत पूर्ण झाली तरी आपल्या इच्छेनुसार पाच वर्षे असे कितीही वेळा वाढवून घेता येते. या पैशाची गरज न पडल्यास जर मुलाच्या नावाने खाते असेल तर त्याला ते आयतेच खाते त्याच्या भावी गरजेनुसार वापरता येईल.

2. म्युच्युअल फंडांच्या योजना: अशा योजना व्यक्ती किंवा त्याची मुले यांच्यासाठी असल्या तरी त्यात फार काही फरक नसतो म्हणून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी अशी गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी आपल्या नावावर वेगळा फोलिओ निर्माण करून त्यात निरंतर गुंतवणूक एस आई पी च्या माध्यमातून करीत राहावे. यातील इक्विटी योजनांतून दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकतो. करसवलत घ्यायची असेल समभाग संलग्न बचत योजनेचा (ELSS) विचार करावा. सहज उपलब्ध आहे म्हणून त्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्याचा फारसा विचार करू नये. आपल्याला पैशांची अंदाजे कधी गरज लागू शकेल त्याच्या 2/3 वर्ष आधी योजनेतून मिळत असलेला परतावा पाहून तो आपणास अपेक्षित किंवा असाधारण असेल तर एस आई पी खंडीत न करता पूर्ण रक्कम काढून लिक्विड फंडात वळवावी. याचा उपयोग आपल्या खऱ्याखुऱ्या गरजेनुसार करता येईल आणि बाजारातील अशाश्वततेचा त्यावर परिमाण होणार नाही. 10 वर्षांहून अधिक काळ सातत्याने गुंतवणूक करीत राहिल्यास चक्रवाढाव्याजाने 15% किमान उतारा मिळायला हरकत नाही. योजनेची निवड करण्यात काही अडचण वाटत असल्यास व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्यावी.

3. शेअर्समध्ये थेट गुंतवणूक: म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर युनिट होल्डरच्यावतीने जे काम करतात ते आपणच करावे आणि अधिक फायदा मिळवावा. हे थोडे कौशल्याचे काम असून अशक्य असे नाही. थोडे जागृत राहून आपल्या गुंतवणुकीवर उच्च परतावा मिळवणे शक्य आहे. यासाठी वेगळे डी मॅट खाते  उघडून यातील गुंतवणूक नियमित गुंतवणूकीपासून वेगळी ठेवावी. कॉफी कॅन पोर्टफोलिओ (CCP) हे एक गुंतवणूक तंत्र असून यांच्या साहाय्याने मागील दहा वर्षांत सर्वोत्तम परतावा देणाऱ्या व त्यात सातत्य राखणाऱ्या कंपन्या आपणास समजल्या तर आपल्या ऐपतीप्रमाणे यात गुंतवणूक करता येईल. यातील समभाग सातत्याने घेऊन म्युच्युअल फंडाप्रमाणे थेट समभागात एस आई पी करता येऊ शकेल. समभागांच्या भावात पडणाऱ्या मोठया फरकापासून आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या गरजेपूर्वी 2/4 वर्ष आधी यातील पूर्णपणे काढून घेऊन लिक्विड किंवा डेट फंडात गुंतवावी. अनेक मोठे फंड हाऊस, वित्तसंस्था त्यांचा सी सी पी दरवर्षी जाहीर करतात. गुगलवरून त्याची माहिती मिळवता येते. वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेता येईल.


वर सुचवलेल्या योजना चढत्या क्रमाने धोकादायक परंतू अधिक उतारा देणाऱ्या आहेत आपल्या जोखीम घेण्याच्या तयारीनुसार याचे एकत्रीकरण करून त्याची टक्केवारी निश्चित करता येईल. ज्यायोगे आपले मुलांच्या कल्याणाच्या उद्दिष्टासाठी वेळेआधीच आर्थिक बळ मिळून ते लवकर पूर्ण करण्याचे समाधान मिळू शकेल.

Share This:

प्रतिक्रिया

manoj on 28 Aug 2021 , 4:21PM

maza mulga 3 yrs ahe tar mala mila sathi LIc Sip konti naws polish ahe sanga.sir

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...