सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आता तरी करा गुंतवणुकींचा पुनर्विचार

14 Jul 2021 By श्री. उदय काशिनाथ पिंगळे
328 0 Comments
post-1

श्री. उदय काशिनाथ पिंगळे

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर अनेक पारंपरिक गृहितकांचा कस लागत असून त्यातून गुंतवणूक या विषयाची सुटका नाही. संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने सर्वच क्षेत्रांची अपरिमित हानी होत आहे. यातून बाहेर पडून नियमित व्यवहार चालू होऊन मागणी वाढायला कालावधी लागेल. यावर मात करण्यासाठी योजलेल्या उपायांचे परिमाण दुहेरी असून यामुळे व्याजदर कमी होऊन महागाई वाढू शकते. महागाई वाढली की क्रयशक्ती कमी, मागणी कमी असे हे दृष्टचक्र आहे. एक सजग गुंतवणूकदार म्हणून या दृष्टीने आपल्या सर्वच गुंतवणुकींचा पुनर्विचार करणे जरुरीचे झाले आहे.

 
आपली गुंतवणूक विविध साधनांत विभागलेली असून त्यातून चांगला परतावा,  सुरक्षितता आणि रोकडसुलभता हवी. असे निकष पूर्ण करणारे एकही गुंतवणूक साधन नाही. परतावा आणि धोका यांचे प्रमाण व्यस्त असल्याने गुंतवणूकदारांनी उपलब्ध पर्याय तपासून काही प्रमाणात अन्य पर्यायांचाही विचार करायला हवा. अजिबातच धोका पत्करायचा नाही हे अधिक धोकादायक असून उपलब्ध पर्याय तपासून पाहुयात.

★ विविध बचत, अल्पबचत योजना, सरकारी कर्जरोखे : यातून मिळणारा परतावा ५.५% ते ७.७५% एवढा आहे. यातील सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (७.१%) सुकन्या समृद्धी योजना (७.६%)  यातील परतावा करमुक्त असल्याने अप्रत्यक्ष परतावा वाढतो परंतू  सुकन्या समृद्धी योजना सर्वांसाठी नाही. दोन्ही योजनांत वार्षिक गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा दीड लाख आहे. सहामाहीस व्याज देणारे ७.७५%  व्याजदराचे भारतीय रिझर्व बँकेचे कर्जरोखे सुरक्षित असून याची किमान मर्यादा ₹१० हजार असून त्यावर कमाल मर्यादा नाही.

★ सोने : हा एक गुंतवणुकीचा पर्याय असला तरी याकडे गुंतवणूकीपेक्षा त्याचे भावनात्मक मूल्य जास्त आहे. गुंतवणूक म्हणून सोने घेणारे ९९% लोक सोने कधीच विकत नाहीत. चलनावरील विश्वास कमी झाल्यास मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होते. जागतिक मंदीमुळे भविष्यात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून अल्पकाळात विक्री करून फायदा मिळवणाऱ्यासाठी यात गुंतवणूक संधी असल्याने ई टी एफ/ ई गोल्ड चा विचार करता येईल.

स्थावर मालमत्ता: यात सध्या करावी लागणारी गुंतवणूक ,मिळणारा परतावा पाहता हा पांढरा हत्ती ठरण्याची जास्त शक्यता असल्याने सर्व दृष्टिकोनातून विचार करूनच निर्णय घ्यावा.

 ★ म्युचुअल फंडातील गुंतवणूक : "म्युचुअल फंड सही है।" च्या जाहिरातीने आणि अन्य ठोस पर्यायांच्या अभावाने, या योजनांनी घरात आणि प्रत्येकाच्या मनात प्रवेश केला आहे. ही सर्वात फसवी जाहिरात आहे. यातून आपल्याला काही करावे लागत नाही, पैसे आपोआप वाढतात असा काहीसा बोध होतो. वेळोवेळी ही गुंतवणूक तपासून, जर अपवादात्मक परतावा मिळत असेल तर तो काढून घेऊन, सुरक्षित आणि करमुक्त परताव्याच्या ठिकाणी ठेवला तरच आपल्या खऱ्याखुऱ्या गरजेला तो उपयोगी पडेल. सध्या यातील गुंतवणूक काढून किंवा एस आय पी बंद करून आपले नुकसानच होणार. या गोष्टी पूर्वपदावर येण्यास तीन वर्षाचा कालावधी लागू शकतो. डेट फंड, जे मुदत ठेवीस पर्याय म्हणून समजले जातात त्यांनी गुंतवणूक केलेले कर्जरोखे अनुत्पादक मालमत्ता होण्याच्या शक्यतेने सुरक्षित समजणे कठीण वाटते.

शेअर्समधील गुंतवणूक : दीर्घकाळात शेअरबाजाराने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. फार थोडे लोक याकडे गुंतवणूक या दृष्टीने पहातात याबद्दल लोकांचे  गैरसमज अधिक असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. अनुभव, थोडीफार समज, पैसे, जोखीम घेण्याची, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, आपण कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहोत याची ओळख, चुकांतून शिकून त्याच चूका न करणे, तीव्र मनोबल हे याचे भांडवल असून यासाठी कोणत्याही विशेष शैक्षणिक पात्रतेची गरज नाही. कॉफी कॅन पोर्टफोलिओ या तंत्राने जगभर अनेकजण गुंतवणूक करतात ते उपलब्ध आहे. सर्वसाधारण दैनंदिन जीवनात मागणी असलेल्या वस्तू, सामान्यज्ञान याचा वापर करून तसेच तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करून अल्पकालीन, मध्यम आणि दीर्घकालीन  गुंतवणूक करून यातून आपली मुद्दल न गमावता आकर्षक परतावा मिळवणे शक्य असून याकडे कोणतेही पूर्वग्रह न ठेवून पाहावे. गुंतवणूकदारांना कोणताही पर्याय नसल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बाजाराकडे चालू असलेला ओघ चालूच राहणार असून, तेजी असो अथवा मंदी त्यातून कायम संधी उपलब्ध आहेत. सध्याच्या परिस्थितीत व त्यानंतर कोणत्या क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकेल याचा विचार करून त्यातील आघाडीच्या कंपन्यात आता गुंतवणूक केल्यास फायदाच होईल. फक्त बाजाराने सध्या तळ गाठला आहे का? यासंदर्भात कोणीच भाकीत करू शकत नसल्याने एकरकमी गुंतवणूक न करता अर्धी गुंतवणूक करून खालच्या टप्यावर गुंतवणूक थोडीथोडी वाढवून, वाढलेल्या भावात थोडी विक्री करावी म्हणजे बाजारात होणाऱ्या भावाच्या फरकाने आपला जीव वरखाली न होता भावातील फरक ही खरेदी विक्रीची संधी वाटेल. ज्यांना मुदत ठेवीप्रमाणे डिव्हिडंडमधून परतावा हवा आहे आणि भावात होणाऱ्या फरकाने थोडाफार फायदा अपेक्षित आहे अशा गुंतवणूक संधी सध्याच्या बाजारात उपलब्ध आहेत. गुंतवणूकदारांना फायदा न होण्याचे मुख्य कारण हे कोणत्याही गोष्टींची तीव्र प्रतिक्रिया आहे. भांडवल बाजाराने जेव्हा तळ गाठला तेथून दीड दोन वर्षात भरारी घेतली आहे यावेळी हा काळ कदाचित वाढू शकेल.

गुंतवणुकीचे आधुनिक पर्याय : यात विविध शेअर्स, इंडेक्स, करन्सी, इंटरेस्ट रेट, कामोडीटीज यांचे  डेरीव्हेटिव्हीज पर्याय यांचा समावेश असून यासाठी अभ्यासाची गरज असून  यातील किमान गुंतवणूक अधिक असून यासाठी अधिक अभ्यासाची जरुरी आहे. किमान ₹ ५० लाख फोलिओ/पैशांच्या माध्यमातून उपलब्ध करून देणाऱ्या फी आकारून सल्ला देणारे गुंतवणूक व्यवस्थापन करून देणारे तज्ञ उपलब्ध आहेत.

सर्वात महत्वाचे - 

घरातील कमावत्या व्यक्तींचा पुरेसा मुदतीचा विमा आणि प्रत्येकाचा आरोग्यविमा असणे हे अत्यंत आवश्यक असून ही एकमेव गुंतवणूक फुकट जावी याच हेतूने केली जाते. ती फुकट जाणे याचा अर्थ आपण जगणे ,आरोग्य चांगले रहाणे असा असून याबाबतीत तडजोड करू नये.

Share This:

प्रतिक्रिया

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...