सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नवी आव्हाने आणि भविष्यासाठी तरतूद

15 Jul 2021 By श्री. उदय काशिनाथ पिंगळे
275 0 Comments
post-1

श्री. उदय काशिनाथ पिंगळे

अचानक आलेल्या जागतिक संकटाचे विविधांगी आणि दूरगामी परिमाण होणार आहेत हे सामान्य माणसालाही उमगले आहे. अत्यंत थोड्या काळात उत्पन्न अचानक कमी होणे, आवश्यक खर्च कमी न होणे आणि भविष्याची चिंता! अनेक आघाड्यांवर लढताना आज जे उत्पन्न आहे त्यातूनच आपल्या निवृत्तीचे नियोजन करण्यास प्राधान्य द्यायला हवे. खासकरून जे मध्यमवयीन आहेत त्यांनी लवकरात लवकर गुंतवणुकीस सुरुवात केली पाहिजे यामुळे चक्रवाढ व्याजाशी निगडित फायदा होतो, थोड्याश्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम उभी राहू शकते. आपले उत्पन्न कितीही कमीजास्त असले तरी त्यातील किमान 10 % भाग हा आपल्या निवृत्ती नियोजनासाठी वेगळा राखून ठेवावा आणि तो त्याच कारणासाठी वापरावा. असे नियोजन करताना काही गोष्टींची ठळकपणे नोंद घेणे आवश्यक आहे त्या अशा--

★आपल्याला महागाई निगडित पेन्शन मिळणार नाही.

★ मिळणारे कुटूंब निवृत्ती वेतन ज्यास उपहासाने बिडी काडी पेन्शन संबोधले जाते मिळाल्यास त्याचा फारसा उपयोग होणार नाही.

★आयुर्मान सातत्याने वाढत आहे.

★आरोग्यावरील खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

★सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ आपल्याला मिळणार नाही.

★महागाई सातत्याने वाढतच राहील.

★मुदत ठेवींवरील व्याजदर रोख्यांचे व्याजदर यात सातत्याने घट होत असल्याने यातून मिळणारे उत्पन्न कमीच असणार त्यामुळे कायम स्वरूपी या उत्पन्नावर अवलंबून राहता येणार नाही. मुदत ठेवीतील गुंतवणूक हा भविष्यात शेवटचा पर्याय राहणार.

★कोणतीही मदत आपल्याला मिळणार नाही. 

★कमी घोक्याची आणि जास्त परतावा देणारी अशी योजना शोधणे दिवसेंदिवस कठीण होत जाणार.

 
हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन आपल्या निवृत्तीची योजना बनवणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करीत असताना त्यातून चांगला परतावा आणि किमान घोका असलेले विविध पर्याय आपण तपासून पाहुयात. आपल्या या योजना अशा प्रकारच्या हव्यात की एक क्षण असा येईल की आपल्या नियोजित वेळेपूर्वीच सुरळीतपणे निवृत्तीचा आपली जीवनशैली फारशी न बदलता सहज स्वीकार करू शकू. यासाठी आवश्यक असल्यास अधिक गुंतवणूक करू. 

★आपले सार्वजनिक भविष्य निर्वाह योजना खाते (PPF), समभाग संलग्न बचत योजना (ELSS), राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) ही खाती चालू ठेवणे: यामध्ये करबचतीचा विचार न करता जास्तीतजास्त  रक्कम भरत राहावी यामुळे दिर्घकाळात मोठी भांडवली रक्कम जमा होईल PPF /ELSS ची रक्कम जरुरीनुसार काढता येईल NPS मधील 60% रक्कम काढता येईल 40% रकमेतून पेन्शन योजना घेता येईल.

★स्थावर मालमत्तेत पर्यायी गुंतवणूक करणे: स्थावर मालमत्तेत गुंतवणूक हा प्राप्त परिस्थितीत उत्पन्नाचे साधन बनण्याऐवजी पांढरा हत्ती बाळगणे ठरू शकते. याला पर्याय म्हणून रिअल इस्टेट इनवेस्टमेंट ट्रस्ट (REIT) चे युनिट घेणे फायदेशीर होऊ शकते. हे कोणतेही दर्शनी मूल्य नसलेले शेअर्स असून त्यातून सातत्याने हमखास लाभांश व भांडवलवृद्धी असा दुहेरी फायदा होऊ शकतो यातील किमान गुंतवणूक 50 हजार आहे जी वाजवी वाटते.

★आकर्षक लाभांश देणारे शेअर्स खरेदी करणे: सातत्याने आकर्षक लाभांश देऊन मुदत ठेवी पेक्षा अधिक परतावा देणारे शेअर खरेदी करण्याची संधी मिळाल्यास त्याचा फायदा घ्यावा यातून डिव्हिडंड भांडवलवृद्धी असा दुहेरी फायदा होईल मात्र REIT हून हे शेअर्स घेणे अधिक धोकादायक आहे ज्यांची निवृत्तीस 10 वर्षे बाकी आहेत  त्यांना या पर्यायाचा विचार करता येईल. 

★चांगले शेअर्स खरेदी करणे : गेली 10 वर्ष ज्यांनी सातत्याने 10 ते 15 भांडवलवृद्धी दिली असे शेअर्स खरेदी करणे कॉफी कॅन पोर्टफोलिओ (CCP) या नावाने हे तंत्र प्रसिद्ध असून ज्यांच्या निवृत्तीस 20 ते 30 वर्ष बाकी आहेत त्यांनी थोडी थोडी गुंतवणूक करून, निवृत्तीच्या 5/7 वर्ष अशी गुंतवणूक वाढवून त्यातील भांडवलवृद्धीच्या अर्धी रक्कम काढून घ्यावी आणि ती पी पी एफ/ एन पी एस सारख्या सुरक्षित पर्यायांकडे वाळवावी. त्यामुळे सातत्याने काहीतरी रक्कम मिळण्याचा पर्याय उपलब्ध राहील. या (CCP) तंत्राने शोधलेल्या अशा शेअर्सची यादी गुगलवर उपलब्ध आहे ती स्वतः अथवा जाणकारांकडून तपासता येईल.

 
★अत्यंत दीर्घ मुदतीचे सरकारी रोखे घेणे : दीर्घ मुदतीचे सरकारी रोखे ज्या वेळी विक्रीस उपलब्ध होतील तेव्हा अथवा दुय्यय बाजारातून खरेदी करता येतील. यातून दीर्घकाळ सातत्याने विशिष्ठदराने नियमित उत्पन्नाची सोय होऊ शकते.

★छोटा मोठा व्यवसाय करणे : यातून पर्यायी उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो जर थेट व्यवसाय जमला नाही कमिशन एजंट सारखा अन्य  व्यवसाय करता येईल. व्यावसायिक पात्रता असल्यास सल्ला देण्याचा व्यवसाय करता येईल.

 
★निवृतांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेणे: खास निवृतांसाठी असलेल्या चालू योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळी तरतूद करणे ज्या योगे गुंतवणूक सुरक्षित राहून नियमित उत्पन्न मिळत राहील. 

★शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार : वरील सर्व गुंतवणुकी पैशांशी संबंधित आहेत पण  मानसिक समाधान देणारी ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे आपल्या जीवनशैलीत असा आमूलाग्र बदल करणे ज्या योगे कोणत्याही बदलांशी जुळवून घेण्याचा त्रास होणार नाही आपल्या अनावश्यक खर्चावर मर्यादा घालणे, खरेदीची प्राथमिकताच बदलणे. आपल्यामुळे कोणाचेही अनावधानाने नुकसान होणार नाही हे पाहणे. आपल्या आवडत्या गोष्टींत कार्यरत राहून समाधान ही वृत्ती बनवणे. व्यक्तीनुसार यात कमी अधिक बदल होऊ शकतात. या सुचवलेल्या पर्यायात बदल /भर पडू शकते परंतू भविष्यात होणाऱ्या बदलाची जाणीव ठेवून, 'सावध ऐका त्याच्या हाका'!त्यानुसार मार्गक्रमण करावे.

Share This:

प्रतिक्रिया

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...