श्री. महेश चव्हाण
२ दिवसापूर्वी उत्तर प्रदेश राज्यात भाजप सरकारला मिळालेल्या जबरदस्त बहुमताच्या निकालामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळाली. माझे एक जुने ग्राहक श्री.कोरे यांचा सकाळी सकाळी फोन आला "महेश आज ऑफिस ला आहेस का ?" मी हो सांगितल्यावर दुपारी ऑफिसला आले आणि हताश नजरेने म्हणाले "मी मार्केटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, गेले २०-२२ वर्ष मार्केट मध्ये गुंतवणूक करतोय पण म्हणावा असा नफा नाही." मला अडचण कळली. आमच्यासाठी त्यांचा हा विषय नवीन नव्हता, कारण गेले ६ वर्ष श्री. कोरे आमचे ग्राहक होते. श्री. कोरे गोदरेज मध्ये कामाला असल्यामुळे चांगला पगार, त्यातच बी.कॉम पदवीधर. त्यामुळे ते १९९४ पासून शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. आज रिटायरमेंटचे आयुष्य जगत मस्त जीवन आनंदात घालवत आहेत पण खंत इतकीच की मार्केट मध्ये १९९४ पासून गुंतवणूक करून सुद्धा म्हणावा असा नफा मिळाला नाही. २०११ ला जेव्हा माझ्याकडे त्यांनी त्यांचा पोर्टफोलिओ आला तेव्हाच त्यातील त्रुटी कळल्या. वेळो वेळी त्या चुका दुरुस्त करा असे बजावले पण ते एकच बोलायचे "तुझे जितके वय आहे तितका माझा अनुभव आहे" पण आता हा आत्मविश्वास निघून गेला होता आणि त्यांनी हार मानली होती. मी ही त्यांना समजवायच्या परिस्थितीत ते नसल्यामुळे काही बोललो नाही. पण दिवसभर एकच विषय डोक्यात थैमान घालत होता. शेअर बाजार एक श्रीमंतीचा राजमार्ग असला तरी अपुरे ज्ञान, स्वतःचे खरे करण्याची वृत्ती, अति हाव, अति भिती यामुळे या मार्गावर अपयश खूप जणांना पदरी येते. श्री कोरे २०-२२ वर्ष बाजारात असून सुद्धा समाधानी नाहीत यामागची पार्श्वभूमी पहिली तर अशी.
- पोर्टफोलिओ मध्ये काळानुसार बदल कधीच केला नाही.
- ज्याप्रमाणे एखाद्या क्रिकेट टीमची वेळोवेळी निवड होत असते आणि फक्त चांगल्या खेळाडूंना त्यांच्या कामगिरीवर संघामध्ये ठेवले जाते, तसे पोर्टफोलिओ मधून MTNL, Unitech असे शेअर्स कधीच बाहेर काढायला पाहिजे होते.
- पोर्टफोलिओ मध्ये ५० च्या वर कंपन्या. सर्वात मोठी चूक. इतक्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असेल तर तुम्ही योग्य लक्षच देऊ शकत नाही अशा पोर्टफोलिओवर.
- नफ्यातील शेअर्स विकणे आणि तोट्यातील शेअर्स नफ्यात येईपर्यंत वाट पाहत बसने.
- सरकारी कंपन्यांमध्ये अति गुंतवणूक. बहुतेक गुंतवणूकदारांना वाटते की सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे आपले पैसे सुरक्षित राहतील पण खरे सांगायचे झाले तर सरकारी कंपन्या जास्त नफा कमाऊ शकत नाहीत कारण नफा कसा येईल याकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष असते.
वरील काही त्रुटी श्री.कोरे यांच्या पोर्टफोलिओ मध्ये होत्या आणि सामान्य गुंतवणूकदार जो नफ्या पासून दूर राहतो तो पण अशाच काही चुका सदैव करत राहतो.
जगभरामध्ये शेअर बाजारातील गुंतवणूक ही श्रीमंतीकडे नेणारी गुंतवणूक म्हणून पहिली जाते पण तरीसुद्धा सामान्य गुंतवणूकदार यातून संपत्ती निर्माण करण्यासाठी जीवाचे रान करतो पण योग्य फॉर्मुला माहित नसल्यामुळे हताश होऊन परत पारंपरिक गुंतवणुकीकडे वळतो. या शेअर बाजारातून संपत्ती निर्माण करण्यासाठी कोणता पर्याय निवडावा हा यक्ष प्रश्न उभा राहतो.
चला तर पाहूया शेअर बाजार गुंतवणुकीचे ३ पर्याय जेणेकरून तुमच्या रिटायरमेंटच्या वेळी श्री. कोरेंसारखे तुम्ही हताश व्हायला नको.
शेअर बाजारातील गुंतवणुकीचे ३ पर्याय पुढीलप्रमाणे आहेत.
✔ शेअर्स खरेदी करणे,
✔ म्युच्युअल फंड
✔ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्विसेस
वरील ३ पर्याय आपण आपल्या गरजेनुसार निवडू शकतो. आज आपण बघूया नक्की हे ३ पर्याय कशा पद्धतीने काम करतात.
१. शेअर्स खरेदी करणे :- बहुतेक नवीन गुंतवणूकदारांना हा एकमेव पर्याय माहिती असतो. मग ते डिमॅट अकाउंट ओपन करून स्वतःकडे असलेल्या माहितीच्या बळावर, ज्ञानाच्या बळावर इथे आपले नशीब आजमावतात. गेले १० वर्ष मी या मार्केटमध्ये आहे. या पर्यायामध्ये स्वतःचा नोकरी-धंदा पाहून या पर्यायामार्फत गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चिकाटी आणि स्वतःला अपडेट ठेवता आले पाहिजे तरच तुम्ही योग्य यश मिळवू शकता कारण २०००-२५०० कंपन्यांमध्ये योग्य १०-१५ कंपन्या शोधणे खूपच मोठे काम आहे. योग्य अभ्यासाशिवाय या पर्यायाकडे वळूच नये हे माझे स्पष्ट मत आहे. ज्याप्रमाणे आपण कार घेण्याआधी ती चालवायला शिकतो, सराव करतो आणि त्यानंतर १-२ वर्षात सराईत चालक बनतो तसेच काहीसे या पर्यायामध्ये आहे.
२. म्युच्युअल फंड :- शेअर बाजारामध्ये नफा पदरी पाडण्यासाठी म्युच्युअल फंड हा सर्वात योग्य पर्याय आहे असे मला वाटते. मागे २ लेखामध्ये आपण म्युच्युअल फंड आणि त्यातील प्रकार पाहिलेच आहेत. कारण इथे तुम्ही १००० रुपये महिना या छोट्या रक्कमेपासून सुरुवात करू शकता. म्युच्युअल फंड गुंतवणुकीची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :- Professional Management (व्यावसायिक व्यवस्थापन), Diversification (विविधता), Liquidity (तरलता), Transparency (पारदर्शकता), Regulation (नियंत्रण)
३. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्विसेस :- तुम्ही कधी BMW – AUDI - मर्सिडीजच्या मालकाला या कार चालवताना पाहिले आहे? पाहिले असेल पण खूप कमीवेळा हो ना ? कारण या कार चालवण्यासाठी अनुभवी चालक लागतात आणि त्याचबरोबर या कारच्या मालकांना तितका वेळ नसतो. याच पद्धतीने पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्विसेस काम करतात. जर तुम्हाला शेअर बाजारामध्ये २५ लाखापेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या पर्यायामध्ये जाऊ शकता. बहुतेक मोठे गुंतवणूकदार आता या पर्यायामध्ये गुंतवणूक करत आहेत. फक्त इथे तुम्हाला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्विसेस कंपनी निवडावी लागेल ज्यांची कामगिरी चांगली असेल.
भारतातील काही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्विसेस कंपन्या
Motilal Oswal Securities Limited, Birla Sun Life, ICICI Securities, HDFC Securities, PPFAS, etc
लक्षात घ्या एखाद्या प्रवासाला जाताना जसे आपल्याकडे वेगवेगळे पर्याय त्याप्रमाणेच शेअर बाजारातील गुंतवणूक करतानासुद्धा वरील पर्याय उपलब्ध आहेत गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने हे पर्याय आणि त्यातील असणाऱ्या वैशिष्टयानुसार आणि स्वतःच्या आर्थिक ध्येयांनुसार निवड करणे गरजेचे आहे.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa