काकूंचे १८०० रुपयांचा समज आणि आपली झाकली मूठ सव्वा लाखाची

श्री. महेश चव्हाण

काल सगळीकडे व्हायरल झालेला काकू आणि त्यांचा १८०० चा हिशेब चा व्हिडिओ त्यावर बनलेले जोक्स पाहिले तर काकू वर हसणे सोपे आहे पण त्यापैकी ५०% लोकांनी स्वतःला आरश्यात पाहिले तर लक्षात येईल… आज जे काकू ना समजत नाही आहे ते आपल्याला समजते म्हणजे आपण शिक्षित आहे असा समज करून ट्रोल करणे सोपे आहे पण आपल्यातील ही ५०% लोक अजून आर्थिकदृष्ट्या अशिक्षित आहेत… ज्या पद्धतीने १८०० रुपये म्हणजे किती हे समजून घेताना किंवा समजून घेण्यात काकूंची तारांबळ उडते तशीच काहीशी परिस्थिती ५०-६०% लोकांची आहे.

१. बचत आणि गुंतवणूक यातील फरक ५०% लोकांना सांगता येत नाही.

२. स्वतःच्या फॅमिली चा महिन्याचा खर्च किती हे ७०% लोकांना सांगता येत नाही.

३. वयाची ४० उलटली तरी अजून टर्म इन्शुरन्स म्हणजे काय माहीत नाही.

४. हेल्थ इन्शुरन्स वरील खर्च म्हणजे काहीजणांना वायफळ खर्च वाटतो.

५. नोकरी आणि व्यवसाय करून १० वर्षे झाली तरी पुढील ३-६ महिन्याच्या खर्चाची तरतूद करून ठेवता आली नाही.

६. स्वतःचा इन्कम टॅक्स कसा कॅलकुलेट होतो अजून आपल्याला माहीत नसते.

७. व्यवसाय करतोय पण GST म्हणजे काय माहीत नसते.

८. शेअर बाजार जुगार आहे हे ठामपणे समाजात बोलत असतो.

९. दामदुप्पट योजनेत बुद्धी गहाण ठेऊन गुंतवणूक ठेवणारे पैसे गुंतवणारे आपणच असतो.

१८०० रुपयांचा हिशेब नाही लागला तर काकू ना तसे काही फरक पडत नाही कारण तो एक व्यवहार आहे पण आयुष्यात शिक्षित समजणारे आपण आर्थिक विषयात अडाणी राहणार असेल तर भविष्यात परिस्थिती पुढीलप्रमाणे आपल्याला चपराक लावल्याशिवाय राहत नाही.

१. कष्ट करून कमावलेला पैसा फक्त बचत केला जातो त्यामुळे त्यात वाढ तर होतच नाही पण महागाई नुसार त्याचे मूल्य कमी होते आणि मग वेळेला कर्जे काढावे लागते.

२. कमावणे आणि खर्च करणे यात इतके व्यस्त असतात लोक कि स्वतःचा ताळेबंद त्यांना माहीत नसतो. त्यामुळे आर्थिक निर्णय चुकतात.

३. घरातील मुख्य व्यक्तीलाच टर्म इन्शुरन्स बद्दल माहिती नसल्याने त्याने तो घेतलेला नसतो त्याचा मृत्यू झाल्यास परिवार कोसळतो.

४. घरातील एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती करायची वेळ आल्यावर सर्व बचत मोडून, सोन्यावर कर्जे घेऊन पैसे भरायची वेळ येते तेव्हा हेल्थ इन्शुरन्स चे महत्व पटते.

५. अचानक नोकरी किंवा व्यवसाय ठप्प होतो आणि जवळ काहीच शिल्लक नसते.

६. वर्षोनुवर्षे कमाई येतेय इन्कम टॅक्स पण भरला जातोय पण तो कसा कॅलकुलेट होतो माहीत नाही.

७. GST च्या नावाने मैफिली रंगल्या असतील पण GST कसा किती चार्ज होतो हे भल्याभल्याना सांगता येत नाही.

८. शेअर बाजारात १ रुपया गुंतवणूक न करता शेअर बाजार म्हणजे जुगार ठामपणे सांगणारे. जागतिक दर्जाच्या व्यवसायात पैसे गुंतवणे हे त्यांना पटत नाही.

९. राष्ट्रीयीकृत बँक जिथे वर्ष्याला ७% व्याजदर देत असताना महिन्याला १०% देणाऱ्या योजनेत पैसे लावून गमावून बसणारे असतात.

वरील विषयांवर आपल्या बरोबर चर्चा केल्या आणि त्याचा व्हिडिओ बनवला तर आपली ही परिस्थिती त्या काकू सारखीच होईल. फरक इतकाच आज गरीब घरकाम करणाऱ्या काकू ट्रोल झाल्या एक मज्जा म्हणून भाग सोडला पण यावर तुम्हाला अतीच हासू येत असेल तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची आहे हे ही लक्षात ठेवा… कारण अजून आपल्याला वरील प्रश्न विचारणारे कोणी भेटले नाही.

***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे “मराठी पैसा – ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा” हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

शेअर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुमच्यासाठी सुचवलेले