“The biggest risk is not taking any risk… In a world that changing really quickly, the only strategy that is guaranteed to fail is not taking risks.”
फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटचा सहसंस्थापक, अध्यक्ष-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानावर असलेल्या मार्क झुकेरबर्गचं हे विधान त्याच्या जोखीम पत्करण्याच्या स्वभावाला आणि दूरदृष्टीला साजेसं आहे. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना फेब्रुवारी २००४ मध्ये वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी त्यानं फेसबुक सुरू केलं तेव्हा त्याला कल्पनाही नसेल की त्याचं हे काळापुढचं ‘इनोव्हेशन’ येत्या काळात अवघ्या जगाला वेड लावणार आहे. त्या वेळी फेसबुकच्या नादाला लागण्याऐवजी एखादी गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून तो स्वस्थ बसला असता तर तो नक्कीच अल्पसंतुष्ट ठरला असता. त्यामुळं त्याच्याच शब्दात सांगायचं तर “आयुष्यात कोणतीच जोखीम न पत्करणं हिच सर्वात मोठी जोखीम आहे…आजच्या दिवसागणीक बदलणाऱ्या जगात कोणतीही जोखीम न पत्करता मळलेल्या वाटांवरून चालत राहणं म्हणजे हमखास अयशस्वी होणं.”
ही सगळी प्रस्तावना लिहिण्याचं कारण म्हणजे बहुतांश गुंतवणुकदारांचा आणि त्यातही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांचा आर्थिक सल्लागाराला पहिला प्रश्न असतो ‘मला म्युच्युअल फंडात गुंतवणूक तर करायची आहे, पण काही रिस्क तर नाही ना?’ याचं एका ओळीत उत्तर द्यायचं झालं तर अन्य अनेक गुंतवणूक प्रकारांप्रमाणेच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतानाही काही प्रमाणात जोखीम ही असतेच. आता म्युच्युअल फंडातील जोखीम नक्की कोणती, तिचे स्वरूप काय याचा विचार करण्यापूर्वी अत्यंत ‘सुरक्षित’ समजल्या जाणाऱ्या अन्य गुंतवणुकींचा विचार करणंही महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांच्या तुलनेत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित की असुरक्षित आहे हे आपल्याला ठरवणं सोपं जाईल.
आपली भारतीय मानसिकता सोन्यातील गुंतवणुकीला सर्वाधिक शुभ आणि सुरक्षित समजते. सोनं घेतलं आणि ते लॉकरमध्ये ठेवलं की झालं असं आतापर्यंत म्हणलं जायचं. पण काही दिवसांपूर्वी बँक ऑफ बडौदाच्या नवी मुंबईतील जुईनगर शाखेत चोरट्यांनी जमीनीखाली भूयार खोदत ज्या नियोजनबद्धपणे दरोडा टाकत या बँकेतले सगळे लॉकर साफ केले त्यानं खातेदारांबरोबरच पोलिसही चक्रावून गेले आहेत. बाकी रोजच्या पेपरमध्येही सोनचाखळी चोरीच्या वाढत्या घटनांचे प्रमाण लक्षात घेता सोन्यातील गुंतवणूक ही अत्यंत जोखमीची झाली आहे यावर आपलं एकमत होऊ शकतं.
हीच गोष्ट रिअल इस्टेटलाही लागू होते. नोटबंदी, रेरा आणि जीएसटी या एकापाठोपाठ एक झालेल्या सरकारच्या महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांतून बांधकाम क्षेत्र हे अद्यापही सावरलेले नाही. त्यामुळं नवीन प्रकल्प तर सोडाच आहे ते प्रकल्प वेळेत पूर्ण करणंही अनेक बांधकाम व्यावसायिकांना शक्य होत नसल्याची स्थिती आहे. घराचा ताबा वेळेत मिळेल का इथपासून ते नवीन फ्लॅट घेत तो तीन-पाच वर्षांनी विकायचा म्हणल्यास निश्चित किती परतावा मिळेल याबाबत कोणतेच अंदाज व्यक्त करणं आजच्या घडीला अवघड आहे.
दुसरीकडे शेअर बाजाराला मात्र गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच झळाळी आली असून, सध्या सेन्सेक्स ३३ हजार निर्देशांकावर (१७ नोव्हेंबर) पोचला आहे. बाजारातील या तेजीमुळे म्युच्युअल फंडातील सामान्य गुंतवणुकदारांचा टक्काही वाढत आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयाचा शेअर बाजाराला आणि म्युच्युअल फंड क्षेत्राला घसघशीत लाभ झाल्याचे अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. नोटाबंदीच्या निर्णायापर्यंत म्हणजे नोव्हेंबर २०१६ पर्यंत म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली एकूण राशी, ज्याला अँसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) म्हणतात ती १६.५ लाख कोटी रूपये इतकी होती. गेल्या वर्षभरात यामध्ये तब्बल पाच लाख कोटी रूपयांची घसघशीत वाढ झाली असून, ऑक्टोबर २०१७ पर्यंत म्युच्युअल फंडातील एयूएम हे २१.४१ लाख कोटी रूपयांवर पोचले.
दुसरीकडे म्युच्युअल फंडात गुंतवणुकीस श्रीगणेशा करणाऱ्या गुंतवणुकदारांचे प्रमाणही गेल्या केवळ एका वर्षात १ कोटी १२ लाखांनी वाढले असून, आजच्या घडीला ६.३२ कोटी भारतीय म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत. आता जोखमीच्या मूळ मुद्याचा विचार करता तुम्ही कोणत्या प्रकारातील म्युच्युअल फंडात तुम्ही गुंतवणूक करत आहात, जसं की इक्विटी, बॅलन्स्ड, डेट, लिक्विड फंड यानुसार जोखमीचे प्रमाणही बदलते. इथं गुंतवणूकदारांनी आवर्जून लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे देशातील वाढती महागाई आणि चलनवाढ हीदेखिल आपली बचतीची राशी वेगाने संपवणारी एक रिस्क असून, चलनवाढीच्या दरापेक्षा उत्तम परतावा हे आज बहुतेक सर्व म्युच्युअल फंड देऊ शकतात. आणखी एक मुद्दा म्हणजे आपण दरवेळी मी लाखभर रूपये गुंतवले तर मला परतावा किती मिळेल, असा विचार करून आपली गुंतवणूक आणि त्यावरील परताव्याचे गुणोत्तर हे आपण जोखमीशी जोडतो. पण अडीअडचणीला आपल्या गुंतवणुकीची राशी त्वरित आपल्या मदतीला धावून येईल का या ‘लिक्विडिटी’च्या निकषावर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही खरोखरच निर्धोक ठरते. कारण म्युच्युअल फंडात गुंतवलेली राशी गुंतवणुकदारांना एकही खेप न मारता अगदी एका दिवसात मिळू शकते, जी अन्य कोणत्याही गुंतवणूक प्रकारात शक्य होत नाही.
शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुंतवणुकीवरील जोखीम ही वयानुसार, उत्पन्नानुसार आणि जबाबदाऱ्यांनुसार बदलणारी संकल्पना आहे. त्यामुळेच अनुभवी गुंतवणूक सल्लागाराकडून ही संकल्पना नीट समजावून घेत गुंतवणुकीस प्रारंभ करावा हे उत्तम.