‘We simply attempt to be fearful when others are greedy and to be greedy only when others are fearful’
जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसर्याa क्रमांकावर असलेले ८७ वर्षीय यशस्वी गुंतवणूकदार-व्यावसायिक वॉरन बफे यांचा हा ‘लोभी’ आणि ‘सावध’ राहण्याच्या सल्ला हा प्रामुख्यानं शेअर बाजारात गुंतवणूक करणार्यांहसाठी आहे. जेव्हा एखाद्या शेअरची खूप हवा आहे, अनेकांना तो हवा आहे, तेव्हा सावध राहा आणि बाजार कोसळत असताना, जेव्हा सगळ्यांना शेअर विकायची घाई आहे, तेव्हा लोभी व्हा, असा मोलाचा सल्ला बफे देतात.
हा सल्ला वाचायला अगदी योग्य असला, तरी आपल्यासारख्या अनेक सामान्य गुंतवणूकदारांची समस्या वेगळीच असते. नेमके कोणते शेअर घ्यायचे, ते नेमके कधी विकायचे, देशात सध्या कोणत्या क्षेत्रातल्या कंपन्या तेजीत आहेत, कोणत्या मंदीत आहेत, अमेरिकेतल्या निवडणुका, भारतातली नोटाबंदी, युरोपातलं ‘ब्रेक्झिट’ यांचा बाजारावर नक्की काय परिणाम झाला किंवा येत्या काळात होणार आहे, या आणि यांसारख्या असंख्य विषयांबाबत आपण अगदीच अनभिज्ञ असतो. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना ‘लोभी’ किंवा ‘सावध’ राहण्यापेक्षा घडणार्याव घटनांची योग्य समीक्षा करता न आल्यानं निष्क्रिय राहण्याकडे आपला कल असतो. परिणामी बाजार कोसळल्यावर आपली कष्टाची बचत मातीमोल होण्याचा धोका असतो.
या सगळ्या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंडाचा पर्याय शेअर बाजाराच्या वाटेनं जाऊनही सुरक्षित ठरतो. शेअर बाजारात थेट गुंतवणूक करताना त्यासंबंधीची सर्व जबाबदारी आणि जोखीम ही गुंतवणूकदाराची स्वतःची असते. याउलट म्युच्युअल फंडात तुम्ही ज्या फंडात गुंतवणूक करत आहात, त्या फंडाचा व्यवस्थापक तुमच्यासह तुमच्यासारख्या हजारो छोट्या गुंतवणूकदारांच्या वतीनं निवडक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. उदाहरणार्थ, तुमच्याकडे दहा हजार रुपये असतील आणि तुम्ही ते शेअर बाजारामार्फत ‘क्ष’ कंपनीत गुंतवले आणि उद्या काही कारणानं कंपनीला तोटा झाल्यामुळे शेअरचा भाव कोसळला, तर त्याची झळ थेट तुम्हाला पोचेल. याच्या उलट म्युच्युअल फंडात दहा हजार रुपये गुंतवल्यावर तुमचा फंड मॅनेजर दहा हजार ‘क्ष’ या एकाच कंपनीत गुंतवण्याऐवजी ‘क्ष’, ‘य’, ‘ल’, ‘व’, ‘र’ या पाच कंपन्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये गुंतवेल. परिणामी बाजारातल्या चढ-उतारांमुळे दोन कंपन्यांचे शेअर खाली गेले, तरी उर्वरित तीन कंपन्यांच्या शेअरमुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित तर राहीलच, शिवाय तुम्हाला फायदा होण्याचं प्रमाणही वाढेल.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट (एसआयपी) म्हणजे दरमहा ठरावीक रक्कम भरण्याचा किंवा एकाच वेळी मोठी रक्कम भरण्याचा असे दोन पर्याय असतात. यापैकी नवीन गुंतवणूकदारांनी ‘एसआयपी’च्या मार्गानं गुंतवणूक करण्यावर प्राधान्य दिल्यास गुंतवणुकीची शिस्त लागून त्याचं दडपण येत नाही. बँकेत रिकरिंंग अकाऊंटप्रमाणे दरमहा ५०० रुपयांपासून ते कितीही रकमेची ‘एसआयपी’ आपण करू शकतो आणि तितकी रक्कम आपण जोडून दिलेल्या बँक खात्यातून दरमहा कापली जाते. म्युच्युअल फंडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही गुंतवलेली रक्कम तुम्हाला त्या वेळच्या बाजारमूल्यानुसार तत्काळ परत मिळू शकते.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना तज्ज्ञ आर्थिक सल्लागारामार्फत ती करणं उत्तम ठरतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची गुंतवणुकीची लघुत्तम आणि दीर्घकालीन उद्दिष्टं विचारात घेऊन तो त्या वेळी बाजारातल्या उपलब्ध फंडांपैकी ठरावीक उत्तम फंडात गुंतवणुकीचा योग्य सल्ला देईल. म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजानं परतावा मिळत असल्यानं दीर्घकालीन गुंतवणुकीवर बँकेतली मुदत ठेव किंवा ‘पीपीएफ’ खात्यापेक्षा उत्तम परतावा मिळण्याची शक्यता असते. मात्र नक्की किती टक्के परतावा मिळेल, याचं प्रमाण निश्चित नसल्यानं अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाकडे वळत नाहीत आणि पर्यायानं उत्तम परताव्याच्या एका महत्त्वाच्या गुंतवणूक पर्यायाकडे पाठ फिरवतात.
म्युच्युअल फंडात आज इक्विटी, लिक्विड, डेट, बॅलन्स्ड असे अनेक पर्याय उपलब्ध असून, तुमचं वय, आर्थिक उद्दिष्टं आणि जोखीम घ्यायची तयारी यानुसार आर्थिक सल्लागाराच्या साहाय्यानं तुम्ही गुंतवणुकीस सुरुवात करू शकता. आज आपल्यापैकी बहुंसख्य लोक खासगी क्षेत्रात नोकरी करत असल्यानं आपल्याला निवृत्तिवेतनाचा पर्याय नाही. त्यामुळेच वयाच्या पंचविशी, तिशी किंवा अगदी चाळिशीपासून पुढील २५-३० वर्षांसाठी ‘एसआयपी’च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर निवृत्तीनंतर ‘एसडब्लूपी’ म्हणजेच ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल ॅन’च्या (एसडब्लूपी) माध्यमातून दरमहा ठरावीक रक्कम काढण्याचा पर्यायही तुमच्याकडे राहील. त्यामुळेच नवीन वर्षात एखाद्या अनुभवी गुंतवणूक सल्लागारामार्फत ठरावीक मोजक्या म्युच्युअल फंडामध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीस प्रारंभ केल्यास २०१७ हे वर्ष तुम्हाला भविष्य सुरक्षित करणारं असं अविस्मरणीय वर्ष ठरेल, यात शंकाच नाही.
९ कोटी गुंतवणूकदार
आजमितीला देशात वेगवेगळ्या ४२ म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत असून, त्यांच्याकडच्या भांडवलाचं एकत्रित बाजारमूल्य नोव्हेंबर २०१६ अखेर १६.५० लाख कोटी रुपये इतकं होतं, जे भारतातल्या म्युच्युअल फंड क्षेत्राच्या गेल्या ५३ वर्षांच्या इतिहासातलंं सर्वोच्च ठरलं. आज देशातले ९ कोटी गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत.