आपल्या देशात स्वार्थी व्यक्तीबद्दल लोकांची मते चांगली नसतात. एखाद्याला स्वार्थी म्हणणे म्हणजे त्याची निंदा केल्या सारखे असते. त्यामुळेच स्वार्थ हा षडरिपुपैकी एक शत्रू मनुष्य जीवनात मानला जातो. परंतु याच्या दोन बाजू असतात असे मला वाटते. दुसर्या बाजूचा विचार करता स्वार्थी असणे आपल्यासाठी चांगले सुध्दा असते. स्वार्थी स्वभावामुळे आपण एक चांगली व्यक्ती बनू शकतो तसेच आपला वैयक्तिक, कौटुंबिक व व्यवसायिक विकास घडवू शकतो. अट फक्त एकच असावी की आपला स्वार्थ साधताना आपल्या हातून इतरांचे वाईट होता कामा नये. अशा स्वार्थीपणामुळे कोणी तुमची निंदासुध्दा कोणी करणार नाही. स्वत:च्या धेय्यपूर्तीसाठी माणसाला स्वार्थी बनून आपल्या वैयक्तिक भरभराटीवर लक्ष केंद्रीत करता आले पाहिजे. स्वत:च्या विकासासाठी प्रत्येकानी स्वार्थी असलेच पाहिजे. कारण ज्याला स्वत:ची पर्वा नसते. जो स्वत:चा विचार करत नाही तो इतरांचा विचार करू शकत नाही. त्यामुळे स्वार्थी असणे थोडे कठीणच असते. स्वार्थी स्वभावामुळे आपण स्वत:च्या हितांचा विचार करू लागतो. आपल्या वैयक्तिक शारीरिक, मानसिक गरजांची पूर्तता करण्यासाठी जबाबदार व्यक्ती बनू शकतो. स्वार्थी व्यक्ती सतत कामात गुंतून राहत नाहीत. स्वत:साठी वेळ काढतात. ते निरोगी असतात. स्वार्थी व्यक्ती आत्मविश्वासू असतात. ते सहसा हार मानत नाहीत.
जेव्हा आपण स्वत:च्या फायद्यासाठी इतरांचा वापर करतो, तेव्हा आपल्या बद्दल द्वेष, अहंकार, ईर्ष्या अशा भावना लोकांच्या मनात निर्माण होतात यातून कधी कधी भांडणे होतात परंतु जर आपण स्वत:च्या स्वार्थासोबतच इतरांचाही फायदा केला तर असा स्वार्थ चांगलाच असतो.
स्वार्थी स्वभावामुळे नेतृत्वगुण वाढीस लागतात. चांगले संबध प्रस्थापित होतात. स्वार्थी व्यक्ती त्यांना आवडीच्या गोष्टी घडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे स्वार्थी व्यक्ती नेहमी आनंदी असतात. स्वार्थी असण्याला पूर्णत: वाईट म्हणणे चुकीचे आहे. स्वार्थी बनणे हा स्वत:ला ओळखण्याची एक किल्ली आहे. तुम्ही स्वत:वर प्रेम करू लागला की त्यावेळी आपल्यासाठी आपणच एक रोल मॉडेल बनतो. पूर्वी प्रसिध्द झालेले लेख वाचण्यासाठी माझा अॅप डाउनलोड करा https://bit.ly/2S9osTH किंवा ९८६७८०६३९९ व्हॉटसअॅप करा.