गुंतवणूक नियोजन योग्य पद्धतीने करणे गरजेचे होते. आज त्याविषयी थोडे जाणून घेऊ.
सेवानिवृत्तीपश्चात आपल्या आर्थिक समीकरणांमध्ये अमुलाग्र बदल होतो. आता आपली आर्थिक गुंतवणूक हाच मासिक उत्पन्नाचा स्रोत बनतो. त्यामुळे साहजिकच गुंतवणुकीकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि आपली उद्दिष्टे पूर्णपणे बदलून जातात.
• निवृत्त व्यक्तीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूक पुंजी आयुष्यभर पुरली पाहिजे. त्यामुळे जोखीम-मुक्त पद्धतीने नियोजन केले पाहिजे. मात्र जोखीम कमी ठेवण्यासाठी सगळीच रक्कम मुदतठेवी किंवा तत्सम व्याज देणाऱ्या गुंतवणुकीत ठेवायची का? तसे केल्यास हळूहळू वाढत जाणाऱ्या महागाईचे चटके ८-१० वर्षांनंतर जाणवू लागतात. मिळणाऱ्या व्याजरूपी उत्पन्नाची क्रयशक्ती कमी होऊ लागते. त्याचप्रमाणे सुरक्षित हात न लावता ठेवलेल्या मुदलाचे देखील मूल्य कमी कमी होऊ लागते. त्यामुळे पूर्णपणे जोखीम-मुक्त म्हणून बनवलेला गुंतवणूक पोर्टफोलिओ दीर्घकाळात आपल्याला मोठ्याच संकटात नेऊ शकतो.
• पण म्हणून दीर्घकालीन चांगल्या परताव्यासाठी सगळ्या गुंतवणुकी इक्विटीमधेच कराव्यात का? अर्थातच नाही, कारण या वयात एवढी जास्त जोखीम गुंतवणुकीत घेण्याची काहीच आवश्यकता नाही. म्हणजेच आपल्याला या दोन्हींचा सुवर्णमध्य गाठणे गरजेचे आहे. मात्र नक्की काय केले असता हा तोल साधेल आणि पुढची २५-३० वर्षं तो सांभाळला जाईल? असं आहे का की आपल्या सगळ्या गुंतवणुकीपैकी काही विशिष्ट टक्के रक्कम इक्विटी मधे ठेवावी आणि बाकीची ठराविक व्याज देणाऱ्या जोखीम-मुक्त ठिकाणी ठेवावे?
• प्रत्येक व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी अर्थातच तपशील बदलत जातील, मात्र सिनियर सिटीझन्सच्या अशा अनेक प्रश्नांचे उत्तर एका सोप्या गुंतवणूक धोरणातून आपण देऊ शकतो. हे धोरण समजून घेण्यासाठी एका काल्पनिक उदाहरणाची मदत घेऊ.
o वयाची साठी गाठलेले देशपांडे काका आणि काकू जुलै २०१९ मधे रिटायर झाले. विविध गुंतवणुकीतून त्यांनी सुमारे १ कोटीचा निवृत्तीनिर्वाह निधी तयार केला आणि पुढील ३० वर्षांसाठी त्याचे नियोजन करायचे आहे. त्यांचा सध्याचा घरखर्च दरमहा ३०,००० आहे आणि दरवर्षी ते फिरण्यावर रू २ लाख खर्च करतील असे गृहीत धरू.
o त्यांनी जर ही सगळी पुंजी जोखीम-मुक्त व्याज देणाऱ्या गुंतवणुकीत ठेवली तर सुमारे ८-१० वर्षात मुद्दल मोडायची वेळ येईल आणि १८-२० वर्षात ती सगळी पुंजी संपून जाईल. त्यामुळे त्यांनी थोडी तरी जोखीम-युक्त गुंतवणूक केली पाहिजे.
o त्यासाठी त्यांनी पुढील ३० वर्षांच्या काळाचा ३ टप्प्यांमध्ये विचार केला पाहिजे. पहिला टप्पा लगेचच्या २ वर्षांसाठीचा. त्यात लागणाऱ्या खर्चासाठीची तरतूद पूर्णपणे जोखीम-मुक्त आणि जेव्हा हवी तेव्हा वापरायला उपलब्ध असेल अशा गुंतवणुकीतून करावी.म्हणजेच आपल्या देशपांडे काकांनी सुमारे ९-१० लाख म्युच्युअल फंडातील लिक्विड योजना किंवा मुदतठेवी अशा ठिकाणी गुंतवावेत. पुढील दोन वर्षात टप्प्याटप्प्याने ही रक्कम व त्यावरील परतावा पूर्णपणे वापरला जाईल. इथे चलनवाढीच्या दराने परतावा मिळणे अपेक्षित आहे.
o आता दुसरा टप्पा वर्ष ३ ते १०चा. या टप्प्यात लागणारी रक्कम ही विविध बॉन्ड्समधे, जास्त परतावा देऊ शकणाऱ्या बॉन्ड फंडात, टॅक्स-मुक्त पब्लिक प्रोव्हीडण्ट फंड किंवा इक्विटी-डेटचे मिश्रण असणाऱ्या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवावी. इथे चलनवाढीच्या दरापेक्षा १%-१.५% जास्त सरासरी वार्षिक परतावा मिळणे अपेक्षित आहे. देशपांडे काकांना या टप्प्यासाठी सुमारे ४५-४७ लाख गुंतवावे लागतील.
o तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे १० वर्षांनंतर लागणारी रक्कम. ही गुंतवणूक पुढील १० वर्षे तरी आपण काढणार नाही आहोत. त्यामुळे त्यात आपण म्युच्युअल फंडांतील इक्विटी योजना निवडू शकतो. ही दीर्घकाळासाठीची गुंतवणूक असल्याने मधल्या काळातील चढउतारांकडे आपण दुर्लक्ष करू शकतो. यात आपल्याला चलनवाढीच्या दरापेक्षा ३%-४% वार्षिक सरासरी जास्तीचा परतावा अपेक्षित आहे. देशपांडे काकांनी या टप्प्यासाठी उरलेली रू ४० लाखांची गुंतवणूक केली पाहिजे.
o पहिला दहा वर्षांचा काळ संपत यायच्या आधी या शेवटच्या टप्प्यासाठीच्या गुंतवणुकीतून काही भाग काढून पुढील दहा वर्षांसाठी पुन्हा असे नियोजन करावे लागेल. या धोरणात फायदा असा आहे की प्रत्येक वेळी पुढील दहा वर्षांच्या खर्चाचे नियोजन झालेले असल्यामुळे गुंतवणूकदार निश्चिंत राहू शकतो आणि इक्विटीमधील गुंतवणुकीस वाढीसाठी आवश्यक अवधी मिळतो.
o या धोरणाचंच एक अपरूप म्हणजे ४-४ किंवा ५-५ वर्षांचे टप्पे बनवायचे आणि एकेका टप्प्यासाठीचे आर्थिक नियोजन किंवा गुंतवणुकींची निवड वेगवेगळे ठेवायचे. यात देखील नजीकच्या भविष्यातील खर्चांसाठी आवश्यक निधी व्याज देणाऱ्या जोखीम-मुक्त गुंतवणुकीत ठेवावा आणि १०-१२ वर्षांनंतर लागणारा निधी इक्विटी म्युच्युअल फंडात ठेवावा, हे समान सूत्र आहे.
o अर्थात ही धोरणे काही गृहीतकांवर अवलंबून आहेत, त्यात टॅक्सचा परिणाम मोजला नाहीये आणि ती राबवताना गुंतवणूकदाराने त्याविषयी जागरूक राहणे, वार्षिक आढावा घेणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे, आकस्मिक निधीचे व्यवस्थापन यापेक्षा निराळे ठेवावे. जर त्यातील निधी वापरला गेला तर पुढील काही काळात खर्चांना कात्री लावून त्याची भरपाई करावी.
o यात आपल्याला हे दिसून येतं की आपलं वय कितीही वाढलं तरी आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधे थोडेफार तरी इक्विटीला स्थान द्यावेच लागते. तुमची पुंजी प्रचंड मोठी आहे आणि गरजा फार कमी आहेत, अशाच परिस्थितीत इक्विटीशिवाय केवळ व्याज देणाऱ्या गुंतवणुकीतून आपले भागू शकते.
• आपण आतापर्यंत चर्चा केलेली ‘टप्पा पद्धत’ हा काही निवृत्तीनिधीसाठी गुंतवणूक धोरण बनवण्याचा एकमेव मार्ग नाही. किंबहुना ही पद्धत काहीशी जुनाट समजली जाते. यापेक्षा वेगळ्या पद्धतीने हे धोरण आखणे शक्य आहे, मात्र त्यासाठी गुंतवणूकदाराला विविध गुंतवणूक पर्यायांची आणि त्यातील जोखमींची जास्त माहिती असणे आवश्यक आहे.
जाता जाता एक छोटीशीच पण महत्त्वाची गोष्ट. इन्शुरन्सचे व्यवस्थापन हे आर्थिक नियोजनाचं अविभाज्य अंग आहे. सेवानिवृत्तीनंतर आपली आयुर्विम्याची गरज संपलेली असते. मात्र हेल्थ किंवा मेडीकल इन्शुरन्सची गरज मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते. त्यासाठी रिटायरमेंटपूर्वी तब्येती व्यवस्थित असताना त्याची पॉलिसी काढून ती चालु ठेवणे गरजेचे असते.
प्रत्येक कंपनीची पॉलिसी वेगवेगळी असते, त्यामुळे विविध मुद्दे नीट लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागतो. अशाप्रकारे सर्वांगीण विचार करून गुंतवणुक व्यवस्थापन केल्यास सर्वांचाच निवृत्तीचा काळ आर्थिकदृष्ट्या सुखाचा आणि समाधानाचा जाईल.