संजीवनी म्हणजे अमरता, जीवन देणारी विद्या. आपल्याला आरोग्य विम्याची सेवा देणाऱ्या योजनेस 'आरोग्य संजीवनी' असे नाव देण्यात आले आहे. देशातील विमा योजनांचे नियमन करून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम भारतीय विमा विनियमक आणि विकास प्राधिकरण (IRDA) करत आहे. कोविड-19 नंतर आरोग्य व्यवस्थेवर पडलेला ताण आणि सर्वसाधारण लोकांना मोठ्या प्रमाणात बसलेला आर्थिक फटका या सर्वाचा विचार करून, स्वतः हून पुढाकार घेऊन सर्व जनरल विमा आणि आरोग्यविमा कंपन्यांना, व्यक्ती/ कुटुंब यांची सर्वसाधारण आरोग्यविषयक प्राथमिक गरज भागवली जाईल अशी किमान एक सर्वसमावेशक व सर्वाना परवडणारी आरोग्यविमा 1 एप्रिल 2020 पासून आणण्याचे आदेश दिले. याप्रमाणे बहुतेक सर्व विमा कंपन्यानी आपल्या इतर अनेक योजनाप्रमाणे "आरोग्य संजीवनी योजना' आणली आहे. यापेक्षा थोडी अधिक सुविधा देणाऱ्या तेवढ्याच रकमेच्या अन्य योजनेच्या तुलनेत यावरील प्रीमियम खूप कमी आहे. त्यामुळे मध्यम उत्पन्न गट असलेल्या व्यक्ती व त्याचे कुटुंबियांना त्याचप्रमाणे पहिल्यांदा आरोग्यविमा घेऊ इच्छिणारे यांच्यासाठी ही मूलभूत आणि प्रमाणित योजना आहे. त्याच प्रमाणे उद्योजकांना आपले कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही योजना घेण्याचा स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे.
योजनेची वैशिष्ट्ये :-
एक मूलभूत आणि प्रमाणित योजना, नियम अटी सर्वत्र सारख्याच, यात रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरच्या खर्चाचा समावेश आहे. जसे विविध तपासण्या, डॉक्टरांचा सल्ला, खर्च, बेड चार्जेस, शुश्रूषा, ICU चार्जेस यासारखे खर्च समाविष्ट आहेत यासाठी लागणारा प्रीमियम कंपनीनुसार वेगवेगळा आहे. तुलनेत सर्वात कमी दरात मिळणारा आरोग्यविमा.
- हा विमा व्यक्तिगत स्वरूपात किंवा कुटूंबास एकत्र अशा स्वरूपात घेता येईल. योजना कालावधी 1 वर्ष असून अनिवासी भारतीय ही योजना घेऊ शकतील त्यांच्या भारतातील निवासी कालावधीत ती वापरता येईल.
- यात एक व्यक्ती तिचे कुटुंब यांना अपेक्षित सर्व आरोग्य विषयक गरजेचा विचार केलेला असून ही सर्व विमा कंपन्या सारखीच सुविधा देतील.
- 18 ते 65 वय असलेल्या कोणासही योजना घेता येईल, आजीवन नूतनीकरण करता येणे शक्य. कुटूंबासाठी घेतलेल्या विमा योजनेत 3 महिने ते व 25 वर्ष वयाची 3 मुले, व्यक्तीचे आई वडील, सासु सारसे अन्य नातेवाईक याचाही ते धारकावर अवलंबून असल्यास समावेश करता येण्याचा पर्याय. योजनेचे सर्व लाभ मिळण्यासाठी मुदतपूर्तीपूर्वी योजनेचे नूतनीकरण करावे. मुदत संपल्यावर 30 दिवसात नूतनीकरण न केल्यास योजना रद्द.
- खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी ही योजना एजंट मार्फत मिळण्याची सोय नाही ती ऑनलाईन घ्यावी लागते यापासून मिळणारे आरोग्य संरक्षण 1 लाख रुपयांपासून पुढे 50 हजारच्या पटीत परंतू 5 लाख रुपये एवढे आहे. अलीकडेच ही अधिकतम 5 लाख मर्यादा रद्द करण्यात आली असून त्यामुळे आता कमी कमीत कमी 50 हजार व कमाल 5 लाख याहून अधिक रकमेचा आरोग्यविमा आता ग्राहकांना घेता येऊ शकेल. नूतनीकरणही ऑनलाईन करावे लागेल.
- योजना ऑनलाईन खरेदी केली त्याची सॉफ्ट कॉपी धारकास देण्यात येईल याशिवाय कराराची प्रत किंवा त्यातील महत्वाच्या तरतुदी लिखित स्वरूपात धारकास देण्यात येतील.
- करार मंजूर नसल्यास 15 दिवसात रद्द करता येईल. रद्द झालेल्या पॉलिसी बद्धल प्रशासकीय खर्च वजा करून सर्व रक्कम परत मिळेल. 30 दिवसापर्यंत 75%, 3 महिन्यापर्यंत 50%, 6 महिन्यानंतर 25% परत मिळेल.
- विमाकर्त्यास विहित मर्यादेत 5% रक्कमेचे अंशदान (co-payment) करावे लागेल.
- पॉलिसी रकमेच्या 2% मर्यादा ही रुग्णालयातील दिवसाच्या खोलीच्या भाड्यावर लावण्यात आली आहे जी जास्तीतजास्त ₹ 5000/- असून 5% मर्यादा ₹ 10000/- ICU साठी आहे.
- इतर कोणत्याही योजनेप्रमाणे एखाद्या वर्षी कोणताही दावा दाखल न केल्यास 5% बोनस मिळेल यामुळे एकूण सुरक्षा रकमेत तेवढ्या प्रमाणात वाढ होईल ती जास्तीतजास्त 50% पर्यंत वाढू शकते.
- कोविड-19 या आजाराची भरपाई यातून घेता येईल.
- मान्यताप्राप्त रुग्णालयातून पर्यायी उपचारपद्धतीने उदा. आयुर्वेद, होमिओपॅथीक या पद्धतीने घेतलेले उपचार मान्य होतील.
- अत्याधुनिक उपचार जसे की, नाकातून कफ काढण्यासाठी balloon sinuplasty, लहान श्वासमार्ग मोकळे करण्यासाठी bronhcial thermoplasty, मेंदू, मज्जारज्जू यावर देखरेख करण्याची ICNM, डोळ्यात सुईने इंजेक्शन देऊन केलेले उपचार, कॅन्सर सारख्या रोगात केलेले तोंडातून औषध देऊन केलेले केमोथेरपी सारखे उपचार, यंत्रमानवाचा उपयोग करून केलेल्या शस्त्रक्रिया, स्टेमसेल रोपणाचे HSCT उपचार, रेडिओ ऍक्टिव्ह किरणांचा वापर करून करता SRS उपचार, गर्भाशय शस्त्रक्रिया, प्रोस्टेस ग्रंथी शररीरातील निकामी भाग नष्ट करण्यासाठी केलेले रेडिओ ऍक्टिव्ह, HIFU, BPH, लेसर यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले उपचार यावरील खर्चासाठी पॉलिसी रकमेच्या 50% मर्यादेत खर्च मान्य होतो.
- पॉलिसी रकमेच्या 25% किंवा कमाल ₹ 40000/- यामधील कमी असलेली रक्कम या मर्यादेत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी खर्च करता येतो.
- दातावरील उपचार, आवश्यकता असल्यास केलेली प्लास्टिक सर्जरीवरील खर्च.
- डे केअर उपचार.
- ₹ 2000/- पर्यंत रुग्णवाहिकेवरील खर्च.
- तुमची सध्याची पॉलिसी यामध्ये बदलून घेता येईल अथवा देणारी कंपनी बदलता (Porting) येणे शक्य.
या योजनेत समाविष्ट न होणारे खर्च :-
- आजाराचा शोध घेण्यासाठी केलेल्या परंतू आजार सिद्ध न झालेल्या विविध तपासण्या.
- सक्तीची विश्रांती किंवा पुनर्वसन यासाठी झालेला खर्च.
- वजन नियंत्रण, जाडी कमी करणे यावरील उपचार.
- लिंगबदल शस्त्रक्रिया.
- सौंदर्य वाढीसाठी केलेल्या शस्त्रक्रिया.
- बाळांतपणावरील खर्च.
- बाह्य रुग्ण उपचार.
- साहसी खेळांमुळे झालेल्या दुखापतीवर करावा लागणारा खर्च.
- बेकायदेशीर कृत्य केल्याने झालेली इजा.
- अल्कोहोल आणि उत्तेजक पदार्थ सेवन केल्याने करावा लागणारा खर्च.
- शिफारस न केलेल्या जीवनसत्व प्रोटिन्स वरील खर्च.
- घरीच केलेले / मान्यता नसलेले उपचार.
- युध्द युद्धजन्य परिस्थिती त्यामुळे झालेली हानी.
- भारताबाहेर घेतलेले उपचार.
योजनेतील उपचार खर्च मान्य होण्याचा विलंबित कालावधी :-
- सुरुवातीचा कालावधी योजना घेतल्यापासून 30 दिवस, अपवाद अपघात. यापूर्वी अपघात झाल्यास खर्चाची भरपाई मिळेल.
- पूर्वआजार असल्यास त्यावरील किंवा त्या अनुषंगाने येणाऱ्या आजारावरील खर्चाची भरपाई 4 वर्षानंतर होईल.
- विशिष्ट आजार त्यावरील उपचार जसे वयोमानानुसार होणारे आजार व त्यावरील उपचार आजारानुसार 2 ते 4 वर्ष कालावधी झाल्यानंतर मान्य होतील.
याचप्रमाणे IRDA ने सर्व विमा कंपन्यांना 'सरल विमा' या नावाने एक मुदत विमा योजना (Turm Insurance) सुरू करणे 1 जानेवारी 2021 पासून अनिवार्य केले आहे. सर्वाना परवडेल अशा दरात एकसमान आणि प्रामाणित पद्धतीची ही योजना असेल. यामुळे अनेक मध्यमवर्गीय लोकांची विम्याची प्राथमिक गरज या दोन्ही योजनांतून अल्पखर्चात भागवली जाईल.
सणासुदीच्या निमित्ताने होणारे आपले अनावश्यक खर्च टाळून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी या योजनेचा विचार करता येईल. येणारे नववर्ष आपणास उत्तम आरोग्याचे व भरभराटीचे जावो, या शुभेच्छा!
********************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://bit.ly/2EP0cPm