पैसे मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात, काहीही न करता भरपूर पैसे आपल्याला मिळावेत याचे बहुतेकांना आकर्षण असते. अशी सुप्त कल्पना एकदा डोक्यात घुसली की अशिक्षित सोडाच, सुशिक्षित लोकांची विवेकबुद्धी काम करेनाशी होते. लोकांच्या याच मानसिकतेचा फायदा काही समाजकंटक उचलून नवनवीन योजना आणत असतात. या सर्वांवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा मर्यादित असल्याने आधुनिक तंत्र वापरून आणि यंत्रणेतील त्रुटी हेरून, काही वेळा राजकिय आशीर्वादाने अशा योजना येत असतात. या योजनांचे सामाईक वैशिष्ठ म्हणजे आधीच्या गुंतवणूकदारांना दिला जाणारा परतावा हा कोणत्याही व्यवसायातून नव्हे तर नव्याने येणाऱ्या गुंतवणुकीतून दिला जातो. जो पर्यंत मोठ्या प्रमाणात नवीन गुंतवणूक येते तोपर्यंत योजना सुरळीत चालते यानंतर ती अचानक बंद होते. यातील पैसे मिळण्याची शक्यता अगदीच कमी असते. काही वेळ नवनवीन गुंतवणूकदारांकडून अधिक परताव्याच्या आमिषाने मोठ्या प्रमाणात रकमा गोळा केल्या जातात, यातील फारच थोड्या गुंतवणूकदारांची काही रक्कम देऊन पोबारा केला जातो. बरीचशी रक्कम संचालकांच्या वैयक्तिक नावे, अन्य खाजगी कंपन्यात वळवली जाते किंवा हवालामार्गे परदेशात पाठवली जाते. सन 1920 मध्ये अमेरिकेत चार्ल्स पोंझी याने 45 दिवसात 50%, तर 90 दिवसात रक्कम दुप्पट करून देतो असे सांगत अनेकांना फसवले होते. तेव्हापासून अशा प्रकारच्या फसव्या योजनांना पोंझी स्कीम असे नाव पडले. अशा अनेक योजनांमध्ये लोकांनी कोणताही सारासार विचार न करता आपली आयुष्यभराची कमाई, फंडातील पैसे, मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी ठेवलेली रक्कम, मालमत्ता गहाण ठेवून, कर्ज घेऊन यात गुंतवणूक केली आहे. योजना फसल्याचा त्यांना जबरदस्त धक्का बसून त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. यासंबंधी सातत्याने पाठपुरावा करण्याचे बहुतांशी लोकांकडे बळ नसते.
फसव्या योजना कशा ओळखाव्या?
★ या योजनांची नोंद कोणत्याही नियामक यंत्रणेकडे नसते. गुंतवणूक करताना ही माहिती दिली जात नाही?
★ या योजनांचे एजंट हे आपले मित्र, हितचिंतक, नातेवाईक,समाजात प्रतिष्ठित समजले जाणारे लोक असतात. त्यांना भरपूर कमिशन मिळत असल्याने, त्यांच्यावर विश्वास ठेवणारे आपल्यासारखे बकरे हवे असतात. यासाठी आपली मैत्री, मागे केलेली मदत, त्यांच्याशी असलेले नाते, जात, आपल्या माणसाला मदत नाही करणार तर कुणाला? वैयक्तिक हमी अशा अनेक भावनात्मक गोष्टी ते पणास लावत असतात. योजना बुडल्यावर हात झटकून ते मोकळे होतात.
★ योजनेस पैसे कसे मिळतील? नफा किती व कसा होईल? याचे खात्रीलायक तपशील न देता यापूर्वी गुंतवणूक केलेल्याना किती व कसा फायदा झाला याचे रसभरीत वर्णन असते. त्यामुळे योजना प्रचलित दराहून इतका अधिक व्याजदर कसा देऊ शकते? असा साधा प्रश्न आपणास पडत नाही.
★ तुमच्याकडून घेतलेल्या पैशांचे काय झाले यासंबंधी कोणतीही माहिती तुम्हाला दिली जात नाही.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यात विविध व्यक्तींनी दाखल केलेल्या गुन्हाचे प्राथमिक अहवाल लक्षात घेऊन अलीकडेच अंमलबजावणी संचनालयाने (ED) गुन्हा दाखल करून घेऊन अर्थशोध निवारण अधिनियमानुसार (PMLA) ऍग्री गोल्ड ग्रुपच्या 3 संचालकांना ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळवली आहे. हा घोटाळा ₹ 6380 कोटीचा आहे. संशयित गुन्हेगारातील ऍग्री गोल्ड गृप संचालक ए व्ही आर राव हे गोल्डन फॉरेस्ट सीआयएस या नावाने फसवी योजना चालविल्या जाणाऱ्या कंपनीत काम करीत होते. या योजनांच्या मागील मर्म जाणून घेऊन, अत्यंत कुशलतेने त्यांनी आपली सात भावंडे, सहकारी यांच्या साहाय्याने 150 हून अधिक कंपन्यांची स्थापना केली. या कंपन्यांच्या माध्यमातून विकसीत भूखंड, शेतजमीन/फार्म उपलब्ध करून त्यातून सर्वोच्च परतावा देण्याचे आश्वासन दिले. हजारो कमिशन एजंटना भरघोस कमिशन देऊन 3202628 गुंतवणूकदारांकडून ₹ 6380/- कोटी रुपये एवढी प्रचंड रक्कम सर्वसामान्य लोकांकडून गोळा केली. शेवटी व्हायचे तेच झाले फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना ना जमीन मिळाली ना पैसे. अशा रीतीने देशभरातून त्यांनी बेकायदेशीररीत्या पैसे जमा केले यात आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, ओरिसा, तामिळनाडू व अंदमान निकोबार द्वीपसमूहातील व्यक्ती प्रामुख्याने आहेत.
अंमलबजावणी संचनालायाच्या दाव्यानुसार यासाठी एक शास्त्रशुद्ध पद्धत राबवण्यात येऊन त्याद्वारे एजंटमार्फत अथवा थेट ठेवी ठेवण्यास प्रोत्साहन दिले गेले. या कंपन्यांनी जमिनीचे ठिकाण, तिचे बाजारमूल्य, चतुःसीमा, खातेउतारा आणि विक्रीसाठीच्या परवानग्या घेतल्या नाहीत तसेच या माध्यमातून पैसे जमा करण्यास भारतीय रिजर्व बँकेकडून कोणतीही परवानगी घेतली नाही. सेबीकडे कंपनी एकत्रित गुंतवणूक व्यवसाय करेल एवढेच म्हटल्याने त्यांनी ठेवी गोळा करण्यास स्थगिती देऊन जमा पैसे परत करण्याचे आदेश दिले. कंपनीने पैसे परत न करता आपल्या अन्य कंपन्यांच्या माध्यमातून पैसे गोळा करणे चालूच ठेवल्याने हा घोटाळा मर्यादित न रहाता त्याचे महाघोटाळ्यात रूपांतर झाले आहे. 32 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांसाठी 5.5 लाख भूखंड असे विसंगत प्रमाण आढळून आले. जमा पैशातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही संचालक व नातेवाईकांच्या वैयक्तिक नावे केली गेली. परदेशात अनेक कंपन्या स्थापून तेथे बेकायदेशीर रीतीनें हवाला मार्गे बरीच रक्कम पाठवण्यात आली. संचालक, लेखापरीक्षकांच्या घर व कार्यालयांवर घाडी घातल्या असता यासंबंधीचे पुरावे, ₹22/- लाख रोख सापडले असून यासंदर्भात शोध आणि तपास चालू आहे.
काही दिवसांनी लोक या गोष्टी विसरतात आणि थोड्याफार फरकाने याच प्रकारांची पुनरावृत्ती ठराविक कालावधीने चालू होते. यात कबूल परतावा सोडाच मूळ रक्कमसुद्धा मिळू शकत नाही याची जाणीव सुजाण गुंतवणूकदार ग्राहकांनी ठेवावी. आपल्या माहितीत अशा प्रकारे एखाद्या फसव्या योजनेद्वारे कोणी रक्कम जमा करीत असल्यास रिझर्व बँकेच्या ही बाब लक्षात आणून द्यावी. यासाठी त्यांनी सचेत या पोर्टलची निर्मिती केली आहे, येथे ऑनलाईन तक्रार करण्याची सोय आहे. याशिवाय असे गुन्हे घडणारच नाहीत अशी अधिक सक्षम तपास यंत्रणा असण्याची गरज आहे. असे व्यवहार करताना पुरेशी काळजी घ्यावी, आवश्यकता असल्यास जाणकारांचा सल्ला घ्यावा.
********************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://bit.ly/2EP0cPm