श्री. महेश चव्हाण
खूप दिवस झाले या ना त्या कारणांनी बिटकॉइन बद्दल कानावर येतंय. कधीच रिस्क न घेणारे आज बिटकॉइन बद्दल भर भरून बोलत आहेत आणि कशाप्रकारे बिटकॉईन हि २१व्या शतकातील चलन आहे आणि इंटरनेट च्या वाढत्या वापरामुळे बिटकॉइन हेच भविष्यतील एकमेव चलन असेल असा समज या लोकांमध्ये पसरत आहे. काही कंपन्यांनी यात सुद्धा योजना आणून मल्टि लेवल मार्केटिंग (MLM) हि जोरात सुरु केले आहे.
2009-10 पासून सुरु झालेली ही संकल्पना भारतात हि मोठया प्रमाणावर पसरत आहे. 2013 ला लोकसत्ता च्या लोकप्रभा या साप्ताहिक मध्ये बिटकॉइन बद्दल सविस्तर लेख आला होता तेव्हापासून बिटकॉइन बद्दल संशोधन सुरू झाले. वित्तीय क्षेत्रातील अनुभवी लोकांशी चर्चा झाली आणि बिटकॉईन पासून दूर राहणे हेच सामान्य माणसाच्या हिताचे आहे हा निष्कर्ष निघाला कारण गुंतवणुकीचा पहिला नियम आहे. "जिथे संशय येतोय तिथे कधीच पैसा गुंतवू नये"
ज्यापद्धतीने बिटकॉइन त्याचे जाळे जगभर इंटरनेट च्या माध्यमातून पसरत आहे त्याचा प्रकार हा एखादया पौंझी योजना सारखा आहे. Ponzi नावाच्या इसमाने 17 व्या शतकात एक योजना आणली होती आणि त्यामध्ये खूप जणांना पैसा गमवावा लागला होता तेव्हा पासून अश्या ज्या योजना बाजारात येतात त्यांना पोंझी योजना बोलले जाते. ट्युलिप फुलांच्या योजनांपासून, शेरेगर दाम दुप्पट योजना, नाशिक ची KBC आणि बिटकॉइन यांची कार्यपद्धती पाहिली तर लोकांपर्यंत पोहचण्याची पद्धत, आता नाही तर कधी तुम्ही पैसा कमावू शकत नाही असे उभे राहिलेले मृगजळ भल्या भल्या लोकांची बुद्धी गहाण ठेवते आणि सुरु होते एक स्वप्न जे सत्यात येणे कठीण असते. मग सामान्य गुंतवणूकदार च्या बाबतीत असे काय होते की जो बँकेच्या मुदत ठेवी, पोस्ट सोने या सर्व सुरक्षित गुंतवणुकीत पैसे गुंतवणारे. शेअर बाजार मुतुअल फंड म्हणजे जुगार म्हणणारे अश्या योजनेत पुढे दिसतात. यामागे कारण एकच माणसाची हाव आणि कमी वेळात मोठी स्वप्न पूर्ण करायची इच्छा यामुळें व्यवहारिक विचार करायची क्षमता बंद होऊन आभासी जगात हे वावरू लागतात.
बिटकॉइन चा इतिहास :-
Satoshi Nakamoto (सातोशी नाकामोटो) या अज्ञात संगणक तज्ञाने बीटकॉईनचे तंत्रज्ञान २००९ मध्ये अस्तित्वात आणले. आजमितीस इंटरनेटवर १०.७१ दशलक्ष बीटकॉईन्स अस्तित्वात आहेत आणी ज्यांची किंमत २१० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास १३ अब्ज रुपये इतकी आहे. बिटकॉइन चा वापर राष्ट्रीय चलनाला पर्याय म्हणून वापर केला जात आहे ज्यामुळे अर्थव्यवस्थेसमोरचे हे नवे संकट येण्यापूर्वीच त्याला थोपवण्यासाठी काही देशांनी कंबर कसली आहे. चीनने राष्ट्रीय चलनाला पर्याय म्हणून बीटकॉईन वापरण्यावर निर्बंध आणले आहेत. अमेरिकेच्या FBI या गुप्तचर यंत्रणेने नुकतेच २०१३ साली Silk Road या ऑनलाइन काळ्या बाजार करणाऱ्या संकेतस्थळावर कारवाई करत २८.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे सुमारे १,४४,००० बीटकॉईन्स हस्तगत केले. मध्यंतरी भारतातील रिझर्व बँकेनेही अशा प्रकारचे 'आभासी चलन' वापरताना परवानगी घेण्यासंदर्भात पत्रक जारी केले होते ज्यामुळे भारतात बीटकॉईन्स ची उलाढाल करणारे Buysellbitco.in हे संकेतस्थळ काही काळ बंद होते.
बिटकॉइन म्हणजे नक्की काय?
बिटकॉइन म्हणजे एक आभासी चलन आहे जे इंटरनेट च्या पायावर उभे आहे. बिटकॉइन आज ऑनलाईन व्यवहारासाठी हि याचा वापर सुरू झाला आहे.
बिटकॉइन ला भारतात कायदेशीर मान्यता आहे का?
जगात जितके चलन आहेत त्यापैकी प्रत्येक चलनाला कोणत्या ना कोणत्या तरी देशाची मान्यता आहे. त्यामुळे जगभरात त्यावर व्यवहार सुरु असतात.बिटकॉइन ला भारतात अजून कायदेशीर मान्यता दिलेली नाही.
बिटकॉइन ची सध्याची भारतीय किंमत ?
एका बिटकॉइन ची सध्याची भारतीय किंमत रुपये 300000 च्या जवळपास आहे. 2013 ला एका बिटकॉइन ला जवळपास रुपये 16000 मोजावे लागायचे.
बिटकॉइन चे मोजमापक ?
सध्या बिटकॉइन ची किंमत ३००००० च्या जवळपास असल्याने या बीटकॉईनची लहान लहान भागात विभागणी करण्यात आली आहे.
1 BTC = १ बीट कॉईन 0.01 BTC = 1 cBTC = १ सेंटी बीट कॉईन 0.01 BTC = 1 mBTC = १ मिली बीट कॉईन 0.000 001 BTC BTC = 1 μBTC = १ मायक्रो बीट कॉईन 0.000 000 01 BTC = १ सातोशी (याला जनकाचे नाव देण्यात आले आहे)
मला कळालेले बिटकॉइन सोप्या भाषेत.
समजा एक छोटेसे गाव आहे आणि तिथे सरकार ने मान्यता दिलेल्या चालनावर व्यवहार सुरु आहेत. पण एक दिवशी गावातील सर्व व्यापारी एकत्र येतात आणि सांगतात की उद्यापासून आमच्याकडून कोणत्याही सेवा किंवा सुविधा घ्यायच्या असतील तर आमाचेच चलन द्यावे लागेल. गावातील।लोकांना हे सर्व नवीन होते. पण पर्याय नसल्यामुळे त्यांनी ते चलन आम्हाला कसे मिळेल असे विचारल्यावर त्या नवीन चलन घेण्यासाठी मोठी रक्कम पुढे द्यावी लागत होती आणि लोकांनी ती दिली कारण पर्याय न्हवता. आता सर्व कायदेशीर चलन गेले व्यापाऱ्यांकडे आणि त्यांचे अनधिकृत चलन आले सामान्य लोकांकडे. आता लक्षात घ्या उद्या जर या व्यापाऱ्यांनी हे अनधिकृत चलन बंद केले तर या गावातील लोकांना देशोधडीला लागण्यास फारसा वेळ लागणार नाही. अशाच काहीसा प्रकार या बिटकॉइन मध्ये दिसतोय.
बिटकॉइन चे भविष्य?
बिटकॉइन वापरा बद्दल अनेक समज गैरसमज आहेत. बहुतेक जण फक्त याच्या वाढणाऱ्या किंमतीकडे बघून या मध्ये गुंतवणूक करत आहेत. बिटकॉइन चा जर इतिहास पहिला तर त्यामध्ये आशादायक चित्राबरोबरच खूप मोठा धोका हि आहे. कारण या चलनाला अजून कायदेशीर मान्यता नाही आहे . लेखामध्ये हि बिटकॉइन बद्दल स्पष्टपणे लिहून सुद्धा बिटकॉइन मध्ये गुंतवणूक कशी करावी विचारणारे गुंतवणूकदार जास्त आहेत. सामान्य व्यक्तीचे अस्सेच होते आयुष्यभर कष्ट करून कमावलेली रक्कम अश्या ठिकाणी गुंतवणूक करायला ते उत्सुक असतात आणि मग नुकसान झाले कि सरकार कडे दाद मागायला जातात. भविष्या मध्ये बिटकॉइन चे काय होईल माहित नाही पण बिटकॉइन चे सध्या दिसणारे चित्र हे भूल-भुलैया सारखेच भासतेय आणि सामान्य गुंतवणूकदारांनी यापासून दूरच राहिलेले बरे हे माझे ठाम मत आहे . कारण जीवनात आर्थिक स्तर उंचावण्यासाठी जोखीम घेणे गरजेचे आहे पण आंधळी जोखीम घेऊन तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकत नाही हे लक्षात घ्या.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa