श्री. महेश चव्हाण
शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी जेव्हा कंपनी निवडायची वेळ येते तेव्हा...
- कोणती कंपनी घेऊ?
- किती काळासाठी गुंतवणूक करू?
- किती नफा मिळेल?
- पोर्टफोलिओच्या किती प्रमाणात घेऊ?
असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात रेंगाळत असतात. आज आपण जरा या प्रश्नांना वाट करून देऊ.
शेअर बाजार मध्ये NSE आणि BSE मध्ये मिळून जवळपास 6000 कंपन्या आहेत. त्यापैकी 2000 कंपन्यांमध्ये नियमितपणे ट्रेडिंगचे व्यवहार होत असतात. आता यातून गुंतवणुकीसाठी योग्य कंपनी निवडणे म्हणजे समुद्रात मोती शोधण्यासारखे आहे. दिसताना हे काम जिकरीचे दिसत असले तरी काही स्मार्ट मूलमंत्र आज अनुभवी गुंतवनुकदार वॉरेन बफेट, पीटर लिंच, फिलिप फिशर, चार्ली मुंगर असे आपल्यासाठी देऊन गेले आहेत. त्यामुळे हे मोती शोधायला आणि त्या माध्यमातून संपत्ती निर्माण करणे सोपे होते.
आज आपण "BUY RIGHT SIT TIGHT" हा एक स्मार्ट मूलमंत्र बघूया. यामध्ये Buy Right म्हणजे चांगल्या कंपन्या खरेदी करणे आणि Sit Tight म्हणजे त्या कंपन्या संपत्ती निर्माण करण्यासाठी आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ठेवणे.
Buy Right हे तत्व कशाप्रकारे काम करते ते पाहूया
कोणतीही कंपनी खरेदी करताना ती योग्य आहे की अयोग्य हे पाहण्यासाठी तिला QGLP FORMULA मधून पडताळून पाहावे लागेल.
QGLP FORMULA:
Q : Quality (दर्जा) : गुंतवणुकीसाठी एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवताना सर्वप्रथम कंपनीचा दर्जा पाहणे महत्वाचे आहे. कंपनीचा दर्जा दोन महत्वाच्या ठिकाणी पाहणे गरजेचे आहे एक म्हणजे व्यवसायाचा दर्जा आणि दुसरे म्हणजे व्यवस्थापनाचा दर्जा. इथे एके ठिकाणी जरी काही खोट असेल तर अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करू नका.
G : Growth (विकास) : ज्या व्यवसायात आपण गुंतवणूक करणार आहोत त्याचा विकास दर आणि त्याच्या क्षेत्रातील विकास दर यापेक्षा जास्त असायला हवा.
L : Longevity (व्यवसायाचे वयोमान) : ज्या व्यवसायामध्ये आपण दीर्घकालीन गुंतवणूक करणार आहोत तो व्यवसाय काळानुसार चालणारा असावा जेणेकरून पुढील 10-15 वर्षात आपण तिथे संपत्ती बनवू शकतो.
P: Price (किंमत) : ज्याप्रमाणे बाजारात आपण एखादी वस्तू घेताना त्या वस्तूची किंमत तपासून पाहतो त्याचप्रमाणे बाजारात शेअर्स घेताना सुद्धा त्याची किंमत, व्यवसायाचे मूल्य योग्य आहे की नाही हे पडताळून पाहणे गरजेचे आहे.
या प्रमाणे QGLP फॉर्म्युला वापरून आपण एखादी कंपनी पडताळू शकतो.
SIT TIGHT :- चांगल्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओ संपत्ती निर्माण करण्यासाठी ठेवणे. बहुतेक वेळेला संपत्ती निर्माण करणारे शेअर्स गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओ येऊन गेलेले असतात पण थोडासा नफा मिळाल्यावर आपण तो नफा पदरात पाडून त्यातून बाहेर पडतो. म्हणून इन्फोसिसच्या शेअर्सनी खूप जणांना नफा दिला पण संपत्ती फक्त ज्यांनी ते शेअर्स आपल्याकडे 10-15 वर्ष ठेवले त्यांनाच करता आली.
"Buy Right Sit Tight" हे साधे आणि सोपे तंत्र आपण शेअर गुंतवणुकीत जर वापरले तर आपणही संपत्ती निर्माण करू शकता.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa