श्री. महेश चव्हाण
आपण ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करताना कोणते शेअर्स निवडावे आणि त्यासाठी कोणती वर्गवारी असते ते पाहूया. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेताना जास्त महत्व उपकरण बनवणाऱ्या कंपनीला देतो, त्यानंतर त्याच उपकरणाचे वैशिष्ट्य आणि किंमत पाहतो, या सर्व गोष्टींची योग्य खात्री झाल्यानंतर आपण ते उपकरण घेण्यासाठी बाजारात जातो. तसेच शेअर बाजारात शेअर्स घेतानाही असाच अभ्यास करावा लागतो. शेअर्सरुपी वटवृक्षाला लागलेली फळे भविष्यात खायची असतील, तर आपल्याला शेअर बाजारातील मोती शोधावे लागतील. चला तर मग जाणून घेऊया "शेअर्सची वर्गवारी ग्रुप A पासून ग्रुप Z पर्यंत... "
गुंतवणूकदाराचे हित लक्षात घेऊन BSE ने त्यांच्या एक्सचेंजवर नोंदणी असलेल्या कंपन्याना काही वर्गवारीमध्ये विभागले आहे. हे वर्गीकरण A, B1, B2, S, T, TS & Z अशा वर्गवारीत गुंतवणूकदारांच्या मार्गदर्शनासाठी केले आहे. ह्या कंपन्यांचे वर्गीकरण काही घटक लक्षात घेऊन केले आहे जसे की
• कंपनीचे भाग भांडवल
• कंपनीच्या शेअर्स मध्ये होणारी खरेदी विक्री
• कंपनीचा नफा
• दिलेला लाभांश (डिव्हिडंड)
वरील मापदंडांव्यतिरिक्त अन्य काही तांत्रिक बाबींचा अभ्यास करून ही वर्गवारी केलेली असते. BSE स्टॉक एक्सचेंजला शेअर्सची संख्या खूप असल्यामुळे शेअर गुंतवणूकदाराला योग्य कंपनी निवडण्यासाठी केलेली ही वर्गवारी खूप मोठी भूमिका बजावते. जसे मोबाइल हँडसेट घेताना बाजारात दोनशेहून अधिक कंपन्या आहेत पण जेव्हा हँडसेट घेण्याची वेळ येते तेव्हा आपण पहिल्या २-४ प्रमुख कंपन्यांचाच विचार करतो. त्याचप्रमाणे शेअर बाजारातून संपत्ती निर्माण करण्यासाठी उतरलेला गुंतवणूकदारालाही BSE ने केलेली वर्गवारी म्हणजे मोती आणि खडे बाजूला केल्यासारखी प्रक्रिया आहे.
कंपन्यांचे वर्गीकरण :-
Group A :- ग्रुप A या वर्गवारीत भाग भांडवल मोठ्या असलेल्या म्हणजेच बाजारातील प्रमुख कंपन्या असतात. या ग्रुपमध्ये लार्ज कॅपवाल्या जवळपास २०० कंपन्या आहेत.
Group B :- ग्रुप B मध्ये अशा कंपन्या असतात की ज्या ग्रुप A कंपन्यांच्या मागोमाग आपली क्षमता राखून असतात. ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी याही कंपन्या योग्य असतात
Group S :- BSE ने जानेवारी २००५ मध्ये ही वर्गवारी चालू केली. ग्रुप S या वर्गवारीला “BSE-Indonext” वर्गवारी ही म्हणतात. यामध्ये BSE च्या ग्रुप B मधील अशा कंपन्या आहेत ज्यांचे भागभांडवल ३ कोटी ते ३० कोटी रुपये आहे आणि यांचे सर्व व्यवहार ऑनलाईनद्वारे केले जातात.
Group Z :- ही वर्गवारी BSE ने १९९९ मध्ये आणली आणि यामध्ये अशा कंपन्या असतात
• ज्यांची कागपत्रांची पूर्तता झालेली नसते
• शेअर होल्डरच्या काही तक्रारी प्रलंबित असतात
• NSDL किंवा CDSL या डिपॉझिटरीशी समन्वय झालेला नसतो
ग्रुप Z वर्गवारीच्या कंपन्या गुंतवणुकीसाठी किंवा ट्रेडिंगसाठी निवडणे म्हणजे आपल्या पैशाला आपणच धोक्यात घालणे असे होईल.
Group T :- ह्या वर्गवारीत अशा कंपन्या असतात ज्यांचे मार्केट मध्ये खूप कमी शेअर्स असतात त्यामुळे रोजच्या व्यवहारावर यांना मर्यादा असतात. या शेअर्स मध्ये तुम्ही डे-ट्रेडिंग करू शकत नाहीत. यांना Trade २ वर्गवारी असे संबोधले जाते.
Group TS :- ह्या वर्गवारीत येणाऱ्या कंपन्या BSE-Indonext सेगमेंट्समधील पण trade to trade व्यवहार होणाऱ्या कंपन्या असतात
या सर्व ग्रुपव्यतिरिक्त अजून दोन वर्गवारी आहेत त्या म्हणजे Fixed Income Securities (Group F) आणि Government Securities (Group G).
आपण अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ऑनलाईन एखादी वस्तू घेताना जितके चौकस असतो तितकेच शेअर बाजारामध्ये कंपनी निवडताना आपण चौकस होणे गरजेचे आहे. कंपन्यांची वर्गवारी ही फक्त एक बाजू आहे. एक सामान्य गुंतणूकदार ते एक स्मार्ट गुंतवणूकदार या प्रवासात अजून खूप काही आपल्याला शिकायचे आहे.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa