श्री. महेश चव्हाण
आज कोरोना सारख्या जागतिक संकटाला संपूर्ण जग सामोरे जात आहे. ६-७ महिने संपूर्ण जग ढवळून निघाले आहे अश्या वेळी आपली संस्कृती आपली परंपरा आपल्याला इतिहासात डोकावून त्यातून काहीतरी शिकवू पाहते. आज दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून वाटतात त्याच सोन्याचे दर मध्यमवर्गीय कुटुंबाच्या खरेदी करण्याच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. ढासळलेली कमाई आणि त्यात आर्थिक जबाबदाऱ्या यातून भविष्याचा विचार ही मनात आला तर समोर खुपजनांना अंधार दिसतोय.
अश्याचवेळी आपले सण संस्कृती आपल्याला एक नवीन उत्तेजन देत असते. त्यातून सकारत्मक दृष्टीने आपण भविष्यात पाहिल्यास नक्कीच नवीन ध्येय सामोरे ठेऊन कार्य करत राहण्याची ऊर्जा आपल्याला मिळते. आजचा दिवस ही तसाच सकारत्मक ऊर्जा देणारा. आज विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी. या दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते.याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे . लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात.
परंपरेप्रमाणे आजच्या दिवशी सरस्वती ची पूजा केली जाते. त्याचबरोबर शेतकरी त्याच्या अवजारांची पूजा करतो, व्यवसायिक त्याच्या व्यवसायातील प्रमुख वस्तूंची पूजा करतो. सरस्वती देवी चे पूजन म्हणजे आपल्या जीवनात आपण मिळवलेल्या शिक्षणाची पूजा किंवा भविष्यात काळानुसार आपले ज्ञान वाढत जावे यासाठी केलेली एक आराधना आपण बोलू शकतो. २०२० च्या सुरवातीपासून सुरू झालेल्या या कोरोना महामारी मुळे जो आर्थिक फटके आपल्याला बसेले आहेत त्यातून बाहेर येण्यासाठी लागणारा काळ प्रत्येकाचा व्यवसाय नोकरी त्यात आपण कोणत्या क्षेत्रांत आहे यावर सारे अवलंबून आहे. पण आज या दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण ज्याप्रमाणे रामाने दहा तोंडी रावणाचा वध केला आणि विजयादशमी साजरी केली त्याचप्रमाणे आपणही आज सीमोल्लंघन करून आपल्यातील काही अनिष्ट सवयी ज्यामुळे आपले आर्थिक जीवन संकटात आले आहे त्यावर विजय मिळवूया. जेणेकरून आपल्या आर्थिक जीवनाची विजयादशमी साजरी करता येईल.
आपण करत असलेल्या १० चुका आणि त्यावर विजय मिळवण्याचे सोपे मार्ग :-
१. आर्थिक जीवनाचे कोणताच ताळेबंद नसणे : आपण महिन्याला १ लाख कमावतो हे सर्वांना माहीत असते पण खर्च किती करतो कुणाला माहीत नसते. यामुळे आर्थिक जीवनाची सुरवातच चुकीची होते.
मार्ग : महिन्याचा खर्च लिहून ठेवायची सवय लावा. सर्व emi सर्व कर्जाचे हफ्ते, घरखर्च याचा ताळेबंद बनवून घ्या. २०-३०% रक्कम बचत होईल याकडे लक्ष द्या.
२) ३-६ महिन्यांचा खर्चाची तरतुद नसणे : तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय त्यात कधी तुमची कमाई बंद होईल याची काही शास्वती नसताना सुद्धा आपण आपल्याकडे ३-६ महिन्याचा खर्च जमा करून ठेवत नाही. कोरोना काळात याचे महत्व सर्वांना पटले असेलच.
मार्ग : ३ महिन्याचा खर्चाची तरतूद करण्यासाठी दरमहा ५-१० हजार बचत चालू करा. एकदा का ही रक्कम जमा झाली तर ती बायको किंवा फॅमिली मधील एका व्यक्तीच्या अकाउंट ला ठेवून द्या जेणेकरून तो इमर्जन्सी फंड तयार होईल.
३) योग्य टर्म इन्शुरन्स नसणे : खूपवेळा आपल्याकडे ४-५ इन्शुरन्स पॉलिसी असतात पण योग्य टर्म इन्शुरन्स नसतो. आज जीवन हे बेभरवशाचे आहे. आपल्याला काही झाले तर परिवाराच्या आर्थिक जीवनासाठी तरतूद असणे गरजेचे आहे.लक्षात ठेवा तुम्हाला जर दूरचा प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे दुचाकी असून उपयोग नाही तुमच्याकडे योग्य चारचाकी असणे गरजेचे आहे.
मार्ग : वर्षाला तुमची जितकी कमाई आहे त्याच्या २५ पट टर्म इन्शुरन्स घ्या. जर तुमच्यावर काही कर्जे असतील किंवा जबाबदाऱ्या असतील त्यानुसार त्यामध्ये वाढ करा.
४) परिवारासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स नसणे : माझ्याकडे 3 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स आहे तो माझ्या परिवारसाठी योग्य आहे. आपण जेव्हा मोबाईल घय्याल जातो तेव्हा १५००० चे बजेट असताना २०००० चा मोबाईल घेऊन येतो. पण हेल्थ इन्शुरन्स काढताना आपण कमीत कमी प्रीमियम बसेल असा कव्हर काढतो.
मार्ग : तुमचे ४ जणांचे कुटुंब असेल तर १० लाख रुपयांचा कव्हर तुमच्या कडे असायलाच हवा. तो काढताना योग्य हेल्थ इन्शुरन्स सल्लागार याकडून सर्व हेल्थ विषयक माहिती घेऊन काढून घ्या. मला काही होत नाही या चुकीच्या आत्मविश्वास ठेवल्याने कोरोना काळात खूप जणांना ४-५ लाख चा फटका बसला आहे.
५) अनावश्यक खर्चावर नियंत्रण नसणे : हातात असलेला स्मार्टफोन, त्यात असलेले ई- कॉमर्स चे अँप, आणि त्याला पयमेंट साठी कनेक्ट केलेली क्रेडिट कार्ड या साऱ्यांचा संगम म्हणजे अनावश्यक खर्च आणि त्यावर कोणताच कॅन्टोल म्हणजेच नियंत्रण नसणे.
मार्ग : सर्व ई-कॉमर्स अँप अन इंस्टॉल करून टाका. जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही डाउनलोड करू शकता. पण यांच्या सतत च्या नोटिफिकेशन आणि टीव्ही वरील जाहिराती यामुळे अनावश्यक खर्च वाढत जातात. हेच खर्च पुढे जाऊन पर्सनल लोन मध्ये कन्व्हर्ट होतात.
६) डोक्यावरील कर्जे फेडण्याची तरतूद नसणे : कर्जे घ्यायला किंवा मिळायला सोपी असतात पण त्याचा परतफेडीचा रोडमॅप आपलाकडे तयार नसतो. हीच छोटी छोटी कर्जे भविष्यात मोठे रूप धारण करतात.
मार्ग :- डोक्यावर असलेली सर्व कर्जे एका कागदावर लिहून काढा. त्यातील जास्त व्याजदर असलेली कर्जे वेगळी करा. जसे की वैयक्तिक कर्जे, व्यवसाय कर्जे ज्यावर १४-१६ टक्के कधी कधी तर १८-२४% व्याजदर असतो. तुमच्याकडे एखादी फडी मध्ये असलेली गुंतवणूक काढून घेऊन कर्जाची रक्कम कमी करा. कारण तुम्ही भरत असलेले व्याज आणि तुम्हला मिळत असलेले व्याज यात बरीच तफावत आहे. त्यासाठी गुंतवणूक कमी करून त्यात कर्जे कमी केलेली कधी ही चांगले.
७) गुंतवणुकीचा कोणताच प्लॅन नसणे : खूपदा आपण ५-१० ठिकाणी वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायात गुंतवणूक करत असतो पण कोणत्या गुंतवणूक कोणत्या आर्थिक ध्येयात साथ देणार आहेत त्याची काही योजना आपल्या हातात नसते.यामुळे जेव्हा कधी पैश्याची गरज लागते तेव्हा आपण मिळेल त्या पर्यायामधून पैसे काढतो. जसे की २०१९ मध्ये एखाद्याने जवळचे सर्व सोने विकून एखादे आर्थिक ध्येय पूर्ण केले असेल तर कुठेतरी हे नुकसान आज झाले असेल.
मार्ग : भविष्यात पुढील ३वर्षे - ७ वर्षे- १० वर्ष्यात आपल्याला।कधी आणि किती पैसा लागणार आहे याचे नियोजन करून घ्या. हे करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घेतल्यास यात अजून स्पष्टता मिळू शकते.
८) टॅक्स वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी घाई-गडबडीत निर्णय घेणे : तुम्ही नोकरदार असा किंवा व्यवसायिक, प्रत्येकाला आपल्या कमाई नुसार टॅक्स भरावा लागतो. दरवर्षी आपल्या कमाई नुसार आपण सरकारला टॅक्स देणे लागतो हे माहीत असून सुद्धा टॅक्स वाचवण्यासाठी १०० पर्याय असताना सुध्दा आपण शेवटच्या क्षणी जागे होऊन घाईत निर्णय घेऊन चूकीचे गुंतवणूक पर्यायात गुंतवणूक करतो.
मार्ग : वर्ष्याचा पहिल्या महिन्यापासूनच जर थोडी रक्कम टॅक्स सेविंग गुंतवणूक पर्यायात गुंतवणूक केली तर शेवटच्या क्षणी चूक होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. टॅक्स फायलिंग साठी CA ची मदत घेतल्यास अतिउत्तम.
९) अर्धवट शिक्षण किंवा माहितीच्या आधारे शेअर बाजारात ट्रेडिंग करणे : हातात असलेला स्मार्टफोन त्याला इंटरनेट चा भन्नाट स्पीड आणि सेविंग अकाउंट मधील शिल्लक रक्कम आणि या सर्वांचा कळस म्हणजे दिवसाला १०००-२००० रुपये हमखास कमवा असे छाती ठोक पणे सांगणारे अदृश्य सल्लागार. जगातील श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफेट बोलतात टिप द्यायची असते घ्यायची नसते पण शेअर बाजारात उतरलेला प्रत्येक व्यक्ती झटपट टिप्स च्या मागे लागलेला असतो.अर्धवट माहिती आणि शिक्षणाच्या जोरावर आपण कधी या चक्रव्यूहात अडकतो हे खुपजनांना कळत नाही आणि कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
मार्ग : शेअर बाजार झटपट पैसे कमावण्याचे साधन नाही तर जागतिक स्तरावर काम करणार्या कंपन्या मध्ये गुंतवणूक करणयाची संधी आहे त्याबद्दल योग्य माहिती घ्या आणी मग सुरुवात करा. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी म्युचुअल फंड हा किफायतशीर पर्याय आहे, त्याचा मार्ग स्वीकारा.
१०) झटपट मालामाल करणाऱ्या गुंतवणूक पर्यायात पैसे गुंतवणे : आजकाल सगळीकडे ठराविक रक्कम भरून महिन्याला ३-५-१०% देणाऱ्या गुंतवणूक योजना गावागावात-तालुक्यात-शहरात चालू असतात. परताव्याचे गणित इतके आकर्षक असते की चांगले शिकलेले लोक ही यात सहज अडकतात.
मार्ग : जिथे राष्ट्रीयकृत बँका ज्यांच्याकडे महिन्याला हजारो करोडो रुपये FD करायला येतात तिथे ते वर्ष्याला ६-७% व्याज देतात. हा दर म्हणजे वाईटात वाईट वेळ जरी आली तरी बँक सहज देऊ शकेल असा हा व्याजदर असतो. पण आकर्षक गुंतवणूक पर्यायात महिन्याला ५-१०% मिळतात म्हणजेच वर्ष्यात रक्कम दुप्पट. जसे आईच्या गर्भात ९ महीने बाळाचे संगोपन होऊन मग ते या जन्म घेते तिथे जर आपल्याला कोणी संगीताले की नवीन औषध आले आहे जेणेकरून बाळाची वाढ 5 महिन्यात होते, तर त्यावर आपण शक्य नाही असे बोलू त्याचप्रमाणे अश्या आकर्षक-झटपट पैसा देणाऱ्या कंपन्या पासून दूर राहणेच चांगले.
"१० तोंडाच्या रावणाच्या रामाने आज केलेला वध म्हणून दसऱ्याला आज वेगळेच महत्व आहे आपणही आपल्या आर्थिक जीवनात होणाऱ्या वरील १० चुका लक्षात ठेवून भविष्यात जास्तीत जास्त अर्थ साक्षर होऊन आपल्या आर्थिक जीवनाला योग्य दिशा देऊ तेव्हाच कुठेतरी आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आज टाकलेले पाऊल म्हणजे सीमोल्लंघन समजले जाईल."
धन्यवाद.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa