श्री. महेश चव्हाण
शेअर मार्केट हे असे एक क्षेत्र आहे. ज्याची माहिती फार कमी लोकांना आहे. त्याबद्दलचे ज्ञान कमी आणि खोट्या कल्पनाच जास्त पसरत असतात. त्याप्रमाणेच जेव्हा जेव्हा शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल लोक एक एक भयानक अनुभव सांगतात तेव्हा माझ्या डोक्यात मृगजळाचे चित्र चमकून जाते. कारण प्रचंड उन्हाच्या कडाक्यात अंगातून घामाच्या धारा लागलेल्या असताना आणि प्रचंड तहान लागली असताना जवळपास पाणी नसते. अशावेळी दूर कुठेतरी पाणी असल्यासारखे दिसते. आपण धावत तिकडे जातो. तेव्हा कळते की ते पाणी नसून केवळ भास होता. यालाच मृगजळ म्हणतात. तसेच या शेअर बाजारामध्ये सामान्य लोकांना दररोज पैसा मिळेल हे मृगजळ आकर्षित करुन घेत असते. कमी पैशामध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी बुद्धी गहाण ठेऊन या मृगजळाच्या मागे धावणारांच्या पदरी निराशा पडते. याउलट काहीजण शेअर बाजार म्हणजे जुगार आहे आणि त्याच्या नादाला सामान्य माणसाने लागू नये असेही कानी कपाळी ओरडून सांगतात. अर्थात या गोष्टीवरचा उपाय कोणी सांगत नाही. त्यामुळे शेअरबाजारात गुंतवणूकीला सुरवात करताना या मृगजळापासून सावध राहून पुढे येणारी निराशा टाळणे हितकर ठरेल. कारण काय करायला पाहिजे हे जितके महत्त्वाचे तितके काय नाही करायला पाहिजे ते समजून घेणे गरजेचे आहे.
शेअर बाजारातील काही चकवे या पासून सावध रहा.
१) दिवसाला हमखास २०००-५००० कमवा :- अलिकडच्या काळात जवळजवळ सगळ्याच वर्तमानपत्रात अशी जाहिरात वाचायला मिळतेच. ही जाहिरात कितपत सत्य आहे? शेअर बाजारात दिवसाला २००० म्हणजे जवळपास (शनिवार-रविवार सोडून) २० दिवसाचे जवळपास ४०००० महिन्याला कमाई असे गणित होते. शेअर बाजारामध्ये दररोज हमखास दिवसाला पैसे कमवायचे कोणतेही सूत्र किंवा मंत्र नाहीत, ते कधी नव्हते आणि भविष्यात सुध्दा येणार नाहीत. असे असते तर जाहिरात देणारांनी फक्त तेच करून पैसे कमवला असता त्यांना नवीन गुंतवणुकदार शोधायची गरज पडली नसती. अशा भूलथापांना बळी पडू नका.
२) आमचे सॉफ्टवेअर घ्या आणि ट्रेडिंग करून नफा कमवा :- हा सुध्दा जाहिरातीचा एक प्रकार आहे. यात साधारण क्रिकेटच्या डकवर्थ लुईस या नियमाप्रमाणे काही गणिते मांडून शेअर बाजारातील शेअरच्या किमंतीच्या मध्ये होणाऱ्या चढ-उताराचे विश्लेषणासाठी बनवलेली असतात. तीच सॉफ्टवेअर साधारण ५००० रुपयांपासून २५००० रुपयांपर्यंत विकली जातात. त्यामुळे गुंतवणूक दाराला काही ज्ञान मिळते मात्र हा सुध्दा पैसे कमवायचा खात्रीशीर मार्ग नव्हे. एवढे लक्षात घेणे गरजेचे आहे.
३) १ लाख गुंतवणुकीवर महिन्याला ३-४% कमवा :- ज्याला शेअर बाजारमध्ये उतरायचे नसते पण अशा स्कीम मध्ये महिन्याला ३-४% मिळत आहेत बोलल्यावर त्याच्याकडे गुंतवणूकदारांच्या रांगा लागतात. आज बँकामध्ये पैसे मुदत ठेवी मध्ये ठेवल्यास वर्षाला ७-८% मिळतात तर इथे महिन्याला ३-४% म्हणजे वर्षाला ३६-४८% परतावा झाला जो कदापिही शक्य नाही.
४) टीव्ही वरील शेअर बाजाराचे चॅनेल आणि वर्तमान पत्र वाचून अभ्यास :- बहुतेक नवख्या गुंतवणूकदारांना असे वाटते कि टीव्ही चॅनेल वर शेअर बाजार विश्लेषकाने सांगितलेले शेअर्स खरेदी-विक्री करून मी नफा कमाऊ शकतो. चॅनेल किंवा वर्तमान पत्रात एखाद्या शेअर्स बद्दल येणाऱ्या बातम्या ह्या Paid News असतात त्यामुळे त्यांची विश्वासहर्ता नसते. आता पर्यंत फक्त चॅनेल किंवा वर्तमान पत्र वाचून शेअर्स बाजारमध्ये गुंतवणूक करुन जगात एकही यशस्वी गुंतवणूकदार झालेला नाही.
५) शेअर बाजार म्हणजे ATM मशिन :- आपण बँक, पोस्ट, इन्शुरन्स पोलिसी किंवा सोन्यामध्ये पैसे गुंतवतो आणि निवांत ५-१० वर्ष थांबतो दुप्पट होईपर्यंत पण जेव्हा आपण पैसे शेअर बाजारमध्ये गुंतवतो तेव्हा दुसऱ्या दिवसापासून त्यात किती वाढ झाली हे पाहायला लागतो. शेअर बाजार गुंतवणूक म्हणजे हापूस आंब्याचे झाड लावण्यासारखी प्रक्रिया आहे. ज्याला फळे लागायला ५-७ वर्ष जावी लागतात आणि एकदा का फळे लागायला सुरवात झाली कि मग मोजता ही येत नाहीत.
६) शेअर बाजारात मला फक्त १०० रुपयाच्या आतील शेअर्स घ्यायला आवडतात :- शेअर बाजारात १ रुपया पासून ५०००० रुपया पर्यंतचे शेअर्स उपलब्ध असतात आणि बहुतेक वेळेला नवीन गुंतवणूकदार हा छोट्या किमतीचे शेअर्स खरेदी करायला उत्सुक असतो कारण मोठया किमतीचा शेअर्स म्हणजे धोका जास्त आणि अजून किती वाढेल वाढून वाढून म्हणून छोट्या शेअर्स कडे वळतात. शेअर्स बाजारात गुंतवणूक करताना किंमती पेक्षा कंपनी बघा, कंपनी च्या मालकाची विश्वासहर्ता बघा, त्यांची उत्पादने पहा. (३०००० च्या गुंतवणूकीत १ तोळा सोने घ्यायचे कि १०० किलो लोखंड हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.)
७) शेअर बाजार जुगार आहे का :- हो शेअर बाजार जुगार आहे अशा लोकांसाठी जे कोणताही अभ्यास न करता शेअर्स च्या किंमतीवर खरेदी विक्री करतात. हे लोक फक्त आज मला काहीतरी ५००-१००० रुपये मिळावे या आशेतून व्यवहार चालू करतात. शेअर ब्रोकरने सांगितलेल्या, चॅनेलवर ऐकून, जवळच्या मित्राचे-नातेवाईकाचे ऐकून शेअर्स ची खरेदी विक्री हाच यांचा अभ्यास असतो.
शेअर बाजार जुगार आहे मग जगातील श्रीमंत माणसे शेअर बाजार मध्ये श्रीमंत कसे होतात :- शेअर बाजारातील यशाचे गणित यातच आहे कि ही श्रीमंत माणसे कोणताही शेअर्स घेण्याआधी स्वतः अभ्यास करतात, त्या कंपनीच्या शेअर्सच्या किंमती पेक्षा तिच्या व्यवसायाला असलेल्या संधी बघतात, त्याच्या उत्पादनाचा अभ्यास करतात आणि मुख्य म्हणजे ते १०वर्षे -२०वर्षे -३० वर्षे अशी दीर्घकालीन गुंतवणूक करतात.
वरील ७ गोष्टी म्हणजेच शेअर बाजारा बद्दलच्या ७ चुकीच्या समजुती आहेत, ज्या शेअर बाजारातील गुंतवणूकीचा श्रीगणेशा करण्याआधी जाणून घेणे गरजेचे आहे. शेअर बाजार कोणतीही गॅरंटी किंवा वॉरंटी देत नाही तर चांगल्या जागतिक दर्जाच्या कंपन्या मध्ये भागधारक म्हणून गुंतवणूक करण्याची संधी देतो, हे लक्षात घ्या.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa