श्री. महेश चव्हाण
जगप्रसिद्ध गुंतणूकदार आणि Rich Dad Poor Dad या त्यांच्या जगप्रसिद्ध गाजलेल्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणतात "जगातील ९०% लोक ही रॅट रेसमध्ये अडकलेली असतात. म्हणजेच काय तर सकाळी उठणे कामाधंद्यास जाणे त्यातून कमावणे, खर्च करणे, देणी देणे, परत कमवणे खर्च करणे देणी देणे आणि हे दुष्टचक्र आयुष्यभर चालूच असते म्हणून ह्या व्यक्ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत" कारण ह्या व्यक्ती आपण कमावलेल्या पैशाचे कधीच संपत्तीत रूपांतर करत नाहीत जसे की...
- रिअल इस्टेट ज्यातून भाडे मिळू शकते किंवा किंमत वाढू शकते.
- शेअर्स खरेदी करणे
- व्यवसायात गुंतवणूक करणे
फक्त आज कमावलेले आज खर्च करणे आणि उद्याची वाट बघणे हेच ते करत असतात आणि यात मूळ अभाव असतो आर्थिक शिक्षणाचा आणि कधीच ना केलेल्या आर्थिक नियोजनाचा.
आपण प्रत्येकाने शाळेत असताना "जोड्या लावा" ह्या प्रकारांमध्ये भरघोस गुण मिळवले असतील इतका सोपा गुण मिळवून देणारा प्रकार होता. पण जेव्हा आज आपल्या जीवनात काही आर्थिक ध्येयं आहेत त्यांच्यासाठी आज आपण काय गुंतवणूक केली आहे अशा जोड्या लावायला सांगितल्या तर किती त्रासदायक होईल? कारण या पद्धतीने आपण कधी विचारच केला नाही. आज आपण आर्थिक ध्येयानुसार कशा पद्धतीने नियोजन करायचे ते पाहूया. एक उदाहरण बघू.
रमेश हा एका IT कंपनीत चांगल्या हुद्दयावर आहे. २ मुले आणि पत्नी असा त्याचा परिवार शहरात राहतो तर आई-वडील मूळ गावी असतात. रमेशच्या जीवनातील आर्थिक ध्येय बघूया
१. स्वतःच्या वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्ती नियोजन
२. मुलांच्या शिक्षणासाठी पुढील १२ वर्षात दरवर्षी जवळपास १. ५० लाख आणि उच्च शिक्षणासाठी दोन्ही मुलासाठी मिळून १० लाख (यामध्ये महागाईनुसार मूल्य पकडले नाही )
३. ३ वर्षानी नवीन घर घ्यायचे आहे त्यासाठी
४. आई-वडिलांच्या औषधपाण्याच्या खर्चासाठी
५. अडीअडचणींसाठी ३-६ महिन्याची तरतूद
रमेशनुसार आपल्या पण जीवनातसुद्धा अशीच आर्थिक ध्येय असतात. पण या प्रत्येक ध्येयासाठी त्या त्या ध्येयानुसार वेगवेगळी गुंतवणूक आपण करत नाही. त्यामुळे आयुष्यभर आपण चिंतेत असतो. आर्थिक ध्येयासाठी गुंतवणूक नियोजन कसे करायचे ते आपण पाहूया
१. तुमची आर्थिक ध्येयं लिहून काढा त्यामध्ये आर्थिक ध्येय, त्याला लागणारी आजची रक्कम आणि कोणत्या वर्षी तुम्हाला हे आर्थिक ध्येय गाठायचे आहे त्याची यादी बनवा.
२. यातील प्रत्येक ध्येयाबद्दल सखोल विचार करा की यातील कोणते ध्येयं ही तुमच्या गरजा आहेत आणि कोणत्या इच्छा आहेत? त्यानंतर यादीतील काही ध्येय तुम्ही स्वतःच काढून टाकाल.
३. ही आर्थिक ध्येय ३ टप्प्यात विभागा...
- Short Term Goals : पुढील ३ वर्षांतील ध्येय
- Mid Term Goals : ३ वर्ष ते ७ वर्षांतील ध्येय
- Long Term Goals :- ७ वर्षांपुढील ध्येय
४. वरीलप्रमाणे विभागणी केल्यानंतर यासाठी गुंतवणुकीची योजना तयार करा. जी गुंतवणूक शॉर्ट टर्म Goals साठी असेल ती लॉन्ग टर्म Goals साठी जर आपण केली तर भविष्यातील ध्येय आपण गाठू शकत नाही हे लक्षात घ्या. म्हणून आर्थिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या पण तो अंमलात आणण्याआधी पडताळून पाहा.
५. एकदा का तुम्ही तुमच्या आर्थिक ध्येयासाठी गुंतवणूक चालू केलीत त्यानंतर वेळोवेळी त्याचे निरीक्षण करीत चला.
आज फक्त गुंतवणूक करून तुमची आर्थिक ध्येयं पूर्ण होणार नाहीत तर योग्य गुंतवणूकीच्या माध्यमातून तुम्ही ती गाठू शकता.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa