श्री. महेश चव्हाण
गेल्या महिन्यात आलेला D-Mart चा आयपीओ शेअरधारकांना त्याचबरोबर कंपनीच्या प्रमोटर्सना मालामाल करून गेला. जवळपास ३०० रुपये किंमतीचा एक शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी ६०० रुपये म्हणजे दुप्पट झाला. D-Mart च्या ह्या जबरदस्त उसळीने सामान्य गुंतवणूकदारांच्या नजरा आता परत एकदा शेअर बाजाराकडे लागल्या आहेत त्याला कारणही तसेच आहे, येत्या काळात अनेक नवनवीन नामांकित कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.
- Indian Railway
- CDSL
- SBI Life Insurance
- The New India Insurance
- NSE
- HUDACO
अशा एक ना अनेक दिग्गज कंपन्या आपला आयपीओ घेऊन बाजारात येत आहेत आणि सामान्य गुंतवणूकदार गुडघ्याला बाशिंग लावून डिमॅट अकाउंट उघडून करून D-Mart सारखे पैसे दुप्पट होतील या आशेवर येणाऱ्या आयपीओची वाट पाहत आहेत.
खरंच आयपीओत गुंतवणूक करून एखादा सामान्य गुंतवणूकदार असामान्य नफा कमाऊ शकतो का? आयपीओत गुंतवणूक करणे शहाणपणा की मूर्खपणा? आयपीओ मधील गुंतवणूकी मधून सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजाराचा श्रीगणेशा करू शकतो का? अशा एक ना अनेक प्रश्न सामान्य गुंतवणूकदारांना पडलेले असतात पण वर्तमानपत्रातून येणारे रकानेच्या रकाने, सगळीकडे दिसणाऱ्या आयपीओच्या जाहिराती, कार्यालय किंवा ट्रेनमध्ये सहकाऱ्यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चा यामुळे आपण गुंतवणूक नाही केली तर कुठे तरी आपण मागे राहू ही भीती. यामुळे आयपीओ आल्यावर झटपट नफा मिळवण्यासाठी गुंतवणूक केली जाते.
आयपीओ मध्ये सामान्य गुंतवणूकदारांनी का गुंतवणूक करू नये याबद्दल "इंटेलिजन्ट इन्व्हेस्टर” या बेंजामिन ग्रॅहम यांच्या पुस्तकामध्ये दिलेले काही महत्वाचे मुद्दे बघूया.
१. IPO च्या वेळी असलेली शेअर्सची किंमत ही योग्य नसते (खूप वेळा यातून प्रमोटर्सचा जास्त फायदा होतो कारण त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रीमियम मध्ये शेअर्स विकायला मिळतात)
२. सामान्य गुंतवणूकदाराला घासाघीस करायला मिळत नाही. त्याच्याविरुद्ध मोठे गुंतणूकदार आणि वित्तीय संस्था यांना सवलतीत शेअर्स मिळतात.
३. कमानीच्या भूतकाळातील कामगिरी चा योग्य लेखा जोखा उपलब्ध नसतो त्यामुळे अभ्यास करणे कठीण जाते.
४. सामान्य गुंतवणूकदारनसाठी खूप कमी वाटा असतो त्यामुळे शेअर्स मिळतील कि नाही हा मोठा प्रश्न असतो.
५. आपल्या कडे एक म्हण आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याच प्रमाणे आयपीओमध्ये लगेच गुंतवणूक करण्यापेक्षा आयपीओ लिस्ट झाल्यानंतर या कंपनीचा अभ्यास सुरु करावा, त्यांची कामगिरी, त्यांची मॅनेजमेंट कशा पद्धतीने निर्णय घेत आहेत, सेवा आणि सुविधा कशा प्रकारे देत आहेत, विकासाचा दर याचा अभ्यास करून मगच गुंतवणूक करावी.
6. खूपवेळा बाजारात चांगल्या कंपन्या उपलब्ध असतात आणि त्यांच्या शेअर धारकांना चांगला परतावा करून देत असतात पण सामान्य गुंतवणूकदार नवीन शेअर्स शोधत असतात जे उपयोगी पडत नाही.
लक्षात घ्या जो व्यवसाय मोठा आहे आणि त्याच बरोबर ज्या शेअर धारकांना डिविडेंड, आणि परतावाही करून देत असतात अशाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली कधीही चांगली. त्यामुळे आयपीओच्या मागे धावण्यापेक्षा बाजारात असलेल्या कंपन्या QGLP फॉर्म्युल्यानुसार तुम्ही निवडू शकता आणि भविष्यात शेअर बाजारातून संपत्ती निर्माण करू शकता.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa