श्री. महेश चव्हाण
आतापर्यंत लेख मालिकेत आपण शेअर बाजारातील विविध गुंतवणूक पर्याय आणि त्यातून कशा प्रकारे संपत्ती निर्माण होऊ शकते हे पाहिले. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यामागे संपत्ती निर्माण करणे तसेच आपली आर्थिक ध्येय पूर्ण करणे हा त्यामागचा उद्देश असू शकतो. जसे की...
- मुलांच्या शिक्षणासाठी
- नवीन/मोठे घर घेण्यासाठी
- मुलीच्या लग्नासाठी
- स्वतःच्या निवृत्ती नियोजनासाठी
अशा प्रकारे आर्थिक ध्येय आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला खुणावत असतात. एका बाजूला वाढणारी महागाई, सुधारत चालला राहणीमानाचा दर्जा आणि प्रत्येक वस्तू ब्रँडेड हवी अशी मानसिकता हे सर्व मिळवण्यासाठी आपली धडपड चालू असते. आज शेअर बाजार गुंतवणुकीतील वेगवेगळे पर्याय समोर दिसत असले तरी या पर्यायाकडे वळण्याआधी स्वतःचे आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत मला किती पैसा आणि कोणत्या आर्थिक ध्येयासाठी कधी लागणार हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मला किती पैसा गुंतवावा, किती जोखीम घ्यावी हे कळणार नाही. तर चला तर मग आज आपण आर्थिक नियोजनाचे महत्व समजून घेऊ.
आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय?
आज प्रत्येक व्यक्तीची मग तो तुमच्या माझ्यासारखा सामान्य व्यक्ती असो किंवा मुकेश अंबानी प्रत्येकाला काही ना काही आर्थिक ध्येय आहेत. आज एखादा व्यक्ती महिन्याला १ लाख रुपये कमवत असेल तर ४०-५०००० जर त्याला महिन्याला घर खर्चाला लागत असतील तर उरलेली रक्कम बचत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून पुढील भविष्यातील गरजांसाठी, अडचणीच्या काळातील खर्चासाठी बाजूला ठेवणे अनिवार्य आहे हो ना? आर्थिक नियोजन म्हणजेच आपल्या भविष्यातील खर्चाचा मागोवा घेणे आणि त्याची तरतूद करणे. आज वाढलेली महागाई, शिक्षण आणि औषध पाण्याचा वाढलेला खर्च त्यामुळे भविष्याबद्दल कमालीची भीती निर्माण झालेली दिसते. या सर्वातून मार्ग काढण्यासाठी "आर्थिक नियोजन" करून घेणे हाच पर्याय उभा राहतो.
आर्थिक नियोजन करताना पुढील मुख्य घटक पहिले जातात...
- सध्याची आर्थिक परिस्थिती
- भविष्यातील आर्थिक ध्येय
- गुंतवणुकीत जोखीम घेण्याची क्षमता
वरील ३ मुख्य घटकावर बहुतेक गोष्टी अवलंबून आहेत. आर्थिक नियोजनाचे खालील मुख्य अंग आहेत.
- पैशाचे व्यवस्थापन
- विमा नियोजन
- गुंतवणूक नियोजन
- निवृत्ती नियोजन
- कर नियोजन
- मालमत्तेचे हस्तांतरणाचे नियोजन
आपण सविस्तर पने प्रत्येक बाजू समजावून घेऊ जेणे करून तुम्हाला स्वतःचे आर्थिक नियोजन करण्यासाठी सोपे पडेल.
पैशाचे व्यवस्थापन :- आर्थिक नियोजन करण्याआधी आपल्या पैशाचे व्यवस्थापन आपण कसे करतो हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. महिन्याला आपण किती कमावतो, किती खर्च करतो, महिन्याच्या खर्चाचे बजेट, वर्षाच्या खर्चाचे बजेट. हे सर्व पैशाच्या व्यस्थापनामध्ये केले जाते. जोपर्यंत तुम्ही पैशाच्या व्यवस्थापनाला महत्व देत नाही तोपर्यंत तुम्ही आर्थिकरित्या तुमचा स्तर उंचावू शकत नाही.
विमा नियोजन :- आज जीवन अनिश्चिततेने भरलेले आहे, त्यामुळे कधी कोणते संकट समोर उभे राहील सांगता येत नाही. विमा नियोजनाच्या माध्यमातून आपण आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या विमा कंपन्यांवर सोपवू शकतो. जीवन विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, घराचा विमा अश्या अनेक पद्धतीने आपण आपल्या भोवती एक संरक्षक कवच उभा करू शकतो. अजून हि भारतीय मानसिकतेतून विमा वरील होणार खर्च म्हणजे वाया गेलेला खर्च समजला जातो.
गुंतवणूक नियोजन :- आर्थिक नियोजनातील महत्वाचा टप्पा म्हणजे गुंतवणूक नियोजन. वेगवेगळ्या आथिर्क ध्येयासाठी वेगवेगळे आर्थिक नियोजन करणे म्हणजे गुंतवणूक नियोजन होय. मुलांच्या शिक्षणासाठी, नवीन/मोठे घर घेण्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी अशा एक ना अनेक ध्येयासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे.
निवृत्ती नियोजन :- आपण २५ वर्ष शिकत असतो आणि २५-३० वर्ष नोकरी किंवा धंदा करतो आणि या काळात जे काही शिल्लक बाजूला ठेवली असते त्यातून आपल्याला आपल्या निवृत्ती नंतर च्या काळासाठी नियोजन करायचं असते. निवृत्ती नियोजन हि काळाची गरज आहे कारण वाढलेला औषध पाण्याचा खर्च यामुळे या नियोजनाची सुरुवात आज पासूनच करा.
मालमत्तेचे हस्तांतरणाचे नियोजन :- बॉलीवूड सिनेमा असो किंवा आपला मराठी सिनेमा मालमत्तेमधील सर्व प्रकारचे वाद आपण त्यामध्ये पहिले आहेत. आज तसे वाद आपल्या घरात नाही होणार कारण ते बहुतेक काल्पनिक असतात पण आज आपल्या मालमत्ता आपल्या कुटुंबाच्या नावावर आपण हयात नसताना हस्तांतरित होताना त्यांना त्रास ना होता करायच्या असतील तर काही तरतुदी आजच कराव्या लागतील. जसे कि इच्छापत्र किंवा मृत्यपत्र बनविणे. लक्षात घ्या आज या गोष्टी खूप सहजरित्या करू शकतो पण अजून पण पैसा कमावण्यातच आपण इतके अडकलो आहोत कि ह्या सर्व गोष्टीकडे पाहायला आपल्याला वेळच नाही.
पैशाचे व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजनाचे महत्व ज्याला पटले आणि त्यानुसार स्वतःच्या आर्थिक जीवनाला ज्यांनी योग्य आकार दिला त्यांची आर्थिक ध्येय दृष्टीक्षेपात येतात कारण एक राजमार्ग त्यांच्यासाठी तयार झालेला असतो. आर्थिक नियोजनाचं नसलेले एक तर बचत करत मन मारून जगत असतात किंवा आलेले पैसे खर्च करून आजचा आनंद घेतात आणि भविष्य भगवान भरोसे ठेवतात. या दोघांचा मध्य म्हणजे आपल्या कमाई नुसार खर्च करणे आणि भविष्यासाठी गुंतवणूक करणे आणि त्याच बरोबर स्वतःच्या कमाईचे पर्याय वाढविणे होय.
आर्थिक नियोजन मध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीला एक वेगळे महत्व आहे. चला तर मग योग्य आर्थिक नियोजनकार गाठून स्वतःचंही आर्थिक नियोजन करून घ्या. जसा प्रत्येक परिवारासाठी एक डॉक्टर असतो तसाच आज आर्थिक नियोजनकार ना महत्व प्राप्त झाले आहे.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa