श्री. महेश चव्हाण
२००८ ला MBA फायनान्स झाल्यावर शेअर बाजारात ब्रोकिंग चा व्यवसाय सुरुवात सुरू केल्यानंतर आतापर्यंत खूप साऱ्या मज्जेशीर गोष्टी घडल्या त्यापैकी काही किस्से.
जून २००९ चा महिना असेल, सांगली वरून आमचे एक मित्रबंधू जे वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांनी उद्या वेळ काढून ठेव खूप महत्वाचे काम आहे त्यासाठी मुंबईला येतोय असा निरोप देऊन ठेवला होता. सकाळी ८.३० ला ऑफिस ओपन करतो हे सांगून सुद्धा हे सकाळी ७.३० लाच ऑफिस च्या पत्त्यावर पोहचले... कसेबसे करून ८.०० वाजता वरळीवरून टॅक्सी करून लोअर परेल ऑफिस वर पोहचलो. तर हे आमचे मित्रबंधू सोबत १०-१२ जण गाडी करून या कामासाठी सांगलीवरून मुंबईला आले होते.
मी व्यवसायात नवीन त्यात आपल्याला भेटायला सांगली वरून गाडी करून माणसे आली आहेत यात माझा ही जोर वाढला.
सर्व मंडळी ना नाश्ता चहा पाणी झाल्यावर आमच्या मित्रबंधूंनी बाहेर जाऊन बोलू म्हणून मला बाहेर नेले.... आणि मग खिशातून एक पिशवी काढून त्यात एक विदेशी चलनाची मोठी नोट बाहेर काढली. प्रथम दर्शनी ही नोट खोटी वाटली... कारण करोड च्या पुढचे आकडे तेव्हा डोक्यात बसायचे नाहीत. त्यात हे चलन कोणत्या देशाचे आहे तेही नीट कळत न्हवते. आमच्या मित्रबंधू आणि त्यांच्यापैकी एक जण यांनी मला या नोटेची किंमत ६५ करोड असल्याचे सांगितले.... आणि सर आपल्याला ५० करोड आले तरी चालतील.... १० करोड तुम्हाला ठेवा बाकी ४० करोड सर्व आम्हाला कॅश करून घ्या. नोटेकडे पाहता तर यापैकी काही खरे असेल असे वाटत न्हवते.... पण मला थोडा वेळ द्या म्हणून इंटरनेट वर चेक केले. सर्व १०-१२ जण मी काय सांगतोय या आशेने माझ्याकडे नजर लावून बसले होते. इंटरनेट वर माहिती काढल्यावर कळाले की ती नोट खरी होती पण गमंत अशी होती त्या नोटेची किंमत त्यावेळी फक्त ६१२ रुपये होती. एका बाजूला ५० करोड च्या आशा तर दुसऱ्या बाजूला ६१२ रुपयांचे वास्तव. आता या १०-१२ जणांना सांगायचे कसे ? कारण ५० करोड मधील ४० करोड आणि त्यात हे १०-१२ जण म्हणजे प्रत्येकी सरासरी ३-४ करोड रुपये यांना मिळणार या आशेने हे माझ्या उत्तराकडे पाहत बसले होते. सांगली वरून फक्त याच कामासाठी ते माझ्या कडे आले होते. माझ्या १० करोड चा विषय गोल झाला होताच☺️ पण यांना आता काय सांगू म्हणून बाहेर गेलो आणि माझा पार्टनर मनोज ला कॉल करून बाहेर ये सांगितले..... आणि त्याला सारा मामला सांगितला.... तो बोलला तू जे शोधून काढले आहेस ते तुझ्याकडेच ठेव नाहीतर किंमत ऐकून यातल्या एखाद्याला हार्ट Attack यायचा नाहीतर आपल्याला मारायला उठायचे....☺️ सरळ "माहीत नाही सांग खूप मोठे प्रकरण आहे सांग"
ऑफिस मध्ये आलो अजून जरा इंटरनेट वर टाईम पास केला. गुगल मध्ये नोट सर्च केली ती नोट कॉम्पुटर स्क्रीन वर दिसली... की मागचे पाहणारे खुश व्हायचे. या सर्व प्रकारात दुपारचे १ वाजले होते. हळूहळू त्यांना ही माझ्याकडून आशा कमी झाल्या. तेवढ्यात एक कॉल आला... या नोटे संदर्भात त्यांची आमच्या सांगली मधील एका मोठ्या राजकारण्याशी मिटिंग रात्री फिक्स झाली होती. आणि परत एकदा त्यांच्या सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या आणि जसे आले तसेच हे सारे सांगलीच्या दिशेने परत गेले.
तरीही जाताना आमचे मित्रबंधु सांगून गेले बघ तुझ्याकडून होत असेल तर मी ज्यादा द्यायला लावतो. ☺️☺️☺️
आता तुम्ही बोलाल इतक्या मोठ्या रक्कमेची नोट कशी तर आर्थिक अराजकता जेव्हा एखाद्या देशात माजते तेव्हा तिथे भरमसाठ महागाई वाढते ज्याचे गणित ही करू शकत नाही. ज्याप्रमाणे आता अफगाणिस्तान मध्ये जीवनाशक्य गोष्टींची किंमत १०० पटीने वाढली आहे तसेच. त्याला आर्थिक भाषेत हायपर-इन्फलेशन बोलतात अश्यावेळी ठराविक कालावधी साठी अश्या नोटा प्रिंट केल्या जातात आणि परत देशात परिस्थिती पुर्ववत झाली की या नोटा चलनातून बंद केल्या जातात. आणि मग त्या अश्या जगभर रंजक मृगजळ घेऊन फिरतात.
पुढे त्या नोटेचे काय झाले काही माहीत नाही पण आजही डॉलर सोडून दुसरे कोणते नवीन चलन दिसले की ही ६५ करोड ची नोट आणि १०-१२ जणांचे चेहरे आणि ६१२ रुपये आठवतात.
यात त्या मित्रबंधु किंवा १०-१२ जणांची खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने किस्सा सांगितला नाही तर अश्या गोष्टी समाजात आजूबाजूला घडत असतात त्यासाठी आर्थिकदृष्ट्या सज्ञान होणे गरजेचे आहे नाहीतर दोन तोंडाचा साप, ११ नखांचे कासव, १९९५ चे अमुक तमुक नाणे किंवा नोट या शोधात आयुष्याची ४-५ वर्षे घालवलेले शिक्षित लोक ही पहायला मिळतात.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa