श्री. महेश चव्हाण
काल आपण शेअर बाजारातील गुंतवणूक करताना आर्थिक नियोजन कसे महत्वाचे आहे ते पहिले. आज आपण आर्थिक जीवनातील महत्वाचे पाऊल ज्याकडे भारतामध्ये दुर्लक्ष केले जाते पण सध्या आपण ज्या पद्धतीचे जीवन अनुकरतोय त्या पद्धतीमध्ये खूप महत्वाचे आहे ते म्हणजे निवृत्ती नियोजन.
भारत हा कौटुंबिक मानसिकतेचा देश समजले जातो, म्हणजे काय तर प्रत्येक भारतीय त्याच्या कुटुंबाच्या गरजेसाठी झटत असतो. आधी आजोबा मग मुलगा मग नातू अशी परंपरा चालूच असते पण काळानुसार आता विभक्त कुटुंब आली. लग्न झाल्या झाल्या मुले वेगळी राहू लागली आणि या व्यवस्थेला कुठे तरी लगाम लागू लागला आहे.
"माझ्या मुळेच माझी संपत्ती आहे" असे म्हणणारा बाघबान सिनेमातला अमिताभ आठवतो का? या मुलाकडे ३-४ महिने तर त्या मुलाकडे ३-४ महिने फिरत राहायची वेळ आली. साधं वर्तमानपत्र पण स्वतःच्या वेळेनुसार वाचू शकत नाही. सिनेमा हा समाजातील कुठतरी घडणाऱ्या घटनांचा आरसा असतो असे समजले तर आज खूप अमिताभ आज आपल्या आजूबाजूला दिसतात हो ना ? यातून आपण काही धडा घेतो का? किंवा घ्यायची वेळ आली आहे का? तर चला मग आज तुमच्या स्वतःसाठी एक पाऊल उचलूया जेणेकरून निवृत्ती नंतर तुमचे जीवन तुम्ही सन्मानाने नाही तर आत्मसन्मानाने जगाल.
माझ्याकडे जेव्हा एखादे जोडपे आर्थिक नियोजन करण्यासाठी येते तेव्हा ते जास्तकरून त्यांच्या मुलाच्या शिक्षणाला किती खर्च येईल, आता पासून आम्ही किती गुंतवणूक करायला घेऊ अशा आर्थिक ध्येयांना जास्त महत्व देतात आणि ते दिलेच पाहिजे पण जेव्हा मी त्यांना तुमच्या निवृत्ती नियोजनाचे काय? असा जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा त्यांची चालढकल सुरू होते कारण त्याबद्दल त्यांनी एकतर विचार केलेला नसतो किंवा त्याची गरज वाटत नसते आणि इथूनच त्यांची बाघबान होण्याची शक्यता चालू होते.
निवृत्ती नियोजन बद्दल जाणून घेऊया.
निवृत्ती नियोजनाचे गणित
१. निवृत्ती नियोजनासाठी अपेक्षित निधी :-
सध्याचे वय :- ३० वर्ष
निवृत्तीचे वय :- ६० वर्ष
निवृत्ती नंतरचा काळ :- २५
सध्याचा मासिक खर्च :- १५०००
महागाई :- ६%
निवृत्तीच्या काळातील होणार खर्च :- ८६०००
निवृत्ती नियोजनासाठी निधी :- २ कोटी (जवळपास)
२. निवृत्ती नियोजनासाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी गुंतवणूक करणे :- म्युच्युअल फंड SIP हा सर्वात योग्य पर्याय आहे तुमच्या निवृत्ती नियोजनाच्या निधी उभारण्यासाठी. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना फक्त तुमच्या जोखमीनुसार म्युच्युअल फंड निवडावेत.
निवृत्ती नियोजनासाठी निधी :- २ कोटी (जवळपास)
ध्येयासाठी असणारा काळ :- ३० वर्ष
अंदाजे परतावा :- १२%
SIP गुंतवणुकीची रक्कम :- ६०००
(६००० ची मासिक SIP म्युच्युअल फंड मध्ये पुढील ३० वर्ष केल्यास तुम्ही २ करोड या तुमच्या लक्षापर्यंत पोहोचू शकता)
३. जमलेल्या रकमेतून नियमित पेन्शन नियोजन करा.
तुम्ही जेव्हा तुमच्या निवृत्तीच्या काळात पोहोचाल तेव्हा मासिक खर्चसाठी लागणारी रक्कम नियमित मिळण्यासाठी SWP (Systematic Withdrawal Plan) मध्ये गुंतवणूक करा.
निवृत्ती नियोजनांसाठी वेगवेगळे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत पण त्यामध्ये गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराचा योग्य सल्ला घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका कारण ३० वर्ष तुम्ही गुंतवणूक करणार आहेत आणि निवृत्तीच्या काळासाठी तुम्हाला ही रक्कम लागणार आहे. निवृत्ती नियोजनाचे अजून काही पर्याय पाहूया.
1. Fixed Deposit
2. Rent Income
3. Senior Citizen Saving Scheme
4. PPF
5. Mutual Fund Income Plans
6. Fixed Maturity Plans
7. Dividend from Mutual Fund & Shares
आज एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही वयाच्या तिशी, चाळीशी किंवा पन्नाशी मध्ये असा, तुमच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी कर्ज मिळू शकते पण तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतर लागणाऱ्या रकमेसाठी कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था जगभरात कुठे ही नाही.
खूपवेळा आपण गुंतवणूक करतो पण इतर सर्व आर्थिक ध्येयांना न्याय देताना कुटुंबतील आपण कर्ते म्हणून आपल्या गरजांवर मुरड घालत असतो. निवृत्ती नियोजनाच्या तरतुदीसाठी मुरड घालू नका तर स्वतःच्या निवृत्ती नियोजनासाठी एक पाऊल उचला.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa