श्री. महेश चव्हाण
शेअर बाजारामध्ये गुंतवणुक करायचा विचार पक्का झाल्यावर विषय येतो ते म्हणजे सुरुवात कुठून करायची. जसे बँकेत फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर आपण बँकेत जाऊन सविस्तर प्रक्रिया पूर्ण करतो तर शेअर बाजारासाठी नक्की सुरुवात कुठून करायची. शेअर्स घेण्यासाठी डिमॅट अकाउंट कुठे खोलायचे बँकेत की ब्रोकर कडे ? ब्रोकर कसा निवडायचा ? व्यवहार कसे करायचे किंवा हे व्यवहार खात्रीशीर कसे होतील असे एक ना अनेक प्रश्न नव्या गुंतवणूकदाराला पडतात. डिमॅट अकाउंट, शेअर ब्रोकर. ऑनलाईन ट्रेडिंग हे सर्व शब्द आतापर्यंत कानावर पडले असतात, गुगल पण या प्रश्नाची असंख्य उत्तरे देतो पण त्यातले खरे आणि विश्वासू उत्तर कोणते ज्यावर पुढची पावले उचलू शकू, माहीतीच्या या महापुरात आधीच शेअर बाजारात जोखीम घ्यायला तयार झालेला गुंतवणूकदार गोंधळून जातो.
या लेखात आपण शेअर बाजाराच्या तांत्रिक बाजू समजून घेऊ ज्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही.
१. डिमॅट अकाउंट :-
भारताबाहेर फिरायला जायचे ठरल्यावर ज्याप्रमाणे तुम्हाला पासपोर्ट ची गरज आहे किंवा गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते त्याचप्रमाणे शेअर्स खरेदी विक्री चा व्यवहार करण्यासाठी डिमॅट अकाउंट गरजेचे आहे. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या आदेशाप्रमाणे शेअर मार्केट मध्ये ज्या सुधारणा करण्यात आल्या त्यामध्ये प्रत्येक गुंतणूकदारास डिमॅट अकाउंट उघडावा लागतो. डिमॅट हा शब्द De-Materialization या शब्दावरून आला आहे. डिमॅट अकाउंट येण्याआधी सर्व व्यवहार हे कागदी स्वरूपात म्हणजे (Materialize) स्वरूपात व्हायचे. डिमॅट आल्यापासून हे व्यवहार वेगाने आणि अचूक व्हायला लागले. १९९६ पासून नॅशनल सेक्युरीटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) ची स्थापना झाल्यापासून बँका ब्रोकर्स यांच्याकडे वेगवान शेअर्स च्या हस्तांतरासाठी ही पद्धत सुरु करण्यात आली. पूर्णपणे संगणक प्रणालीवर आधारित असल्यामुळे शेअर्सचे व्यवहार पूर्वीच्या पेक्षा कैकपटीने वेगवान होऊ लागले . डिमॅट अकाउंट उघडण्याचा उद्देश म्हणजे त्या अकाऊंटमध्ये आपले निरनिराळ्या कंपन्यांचे शेअर्स जमा होण्याची व्यवस्था असते. हे डिमॅट अकाउंट बँका किंवा नोंदणीकृत ब्रोकरकडे उघडता येतो. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी गुंतवणूकदाराचे पॅन कार्ड, सेविंग बॅंक अकाउंट रहीवासाचा पुरावा, फोटो या गोष्टी आणि त्याचबरोबर स्वतःचा सक्रिय मोबाइल नंबर आणि ई-मेल गरजेचा आहे.
२. डिमॅट अकाउंट चार्जेस :-
अकाउंट ओपन करण्यासाठी १०० ते ५०० रुपयांपर्यंत खर्च येतो. आता बहुतेक ब्रोकर डिमॅट अकाउंट मोफत उघडून देतात. त्याचबरोबर डिमॅट अकाउंट चे वर्षभराचे ठराविक चार्जेस असतात त्यातही सरासरी १०० रुपयापासून १००० रुपयांपर्यंतच्या स्किम उपलब्ध असतात. डिमॅट अकाउंट उघडताना याची सर्व माहीती ब्रोकरकडून घ्यावी आणि आपण वर्षभरात कीती व्यवहार करणार आहोत त्यानुसार योग्य ती स्किम निवडावी. डिमॅट अकाउंटची फी बहुतेक ब्रोकर १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीसाठी आकारतात.
३. डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट मध्ये फरक काय ?
डिमॅट अकाउंट शेअर्सचा हीशेब ठेवतात आणि लॉकरसारखे जपून ठेवतो. ट्रेडिंग अकाउंट शेअर्सच्या खरेदी विक्रीसाठी वापरले जातात. तर ट्रेडिंग अकाउंटचा वापर करून खरेदी केलेले शेअर्स डिमॅट अकाउंट जमा होतात आणि ट्रेडिंग अकाउंट वापर करून विकलेले शेअर्स डिमॅट अकाउंटमधून वजा होतात.
४. डिमॅट अकाउंटला नॉमिनी :-
शेअर्स मध्ये गुंतवणूक ही दीर्घकालीन स्वरूपाची असल्यामुळे डिमॅट अकाउंटला योग्य नॉमिनी आणि त्यांची योग्य माहीती अकाउंट ओपन करते वेळी देणे गरजेचे आहे आणि वेळोवेळी त्यामध्ये बदल केला पाहीजे.
५. शेअर ब्रोकर कसा निवडावा ? :-
शेअर मार्केट मधील सर्वात महत्वाचा व्यक्ती म्हणजे ब्रोकर. शेअर्सच्या खरेदी-विक्रीसाठी पूर्वीपासून ब्रोकरच्या मध्यस्तीशिवाय शेअर्स घेता येत नाहीत किंवा विकत येत नाहीत. आज बाजारात खूप नावाजलेले ब्रोकर आहेत. शेअर ब्रोकर निवडताना सेबी च्या वेब्सिते ला जाऊन त्याच्या विरोधात काही तक्रारी आहेत का ? मुख्य मालकाचा रेकॉर्ड काय आहे ? शेअर बाजाराचा व्यवहार म्हणजे पैशाचा व्यवहार त्यामुळे काही ना काही तक्रारी या सेबीकडे होत असतात फक्त हे पाहणे गरजेचे आहे की तक्रार साधारण आहे की गंभीर स्वरूपाची. शेअर ब्रोकर आज त्यांचा व्यवसाय वाढीसाठी आणि ग्राहकांना योग्य सेवा देण्यासाठी सब-ब्रोकर निवडतात त्यामुळे ब्रोकर निवडताना तुम्ही अकाउंट सब-ब्रोकर कडे उघडतंय की डायरेक्ट ब्रोकर कडे हे पहा. सब-ब्रोकर कडे संपर्क करणे, आपल्या अकाउंट बद्दल माहीती घेणे सोपे असते.
६. शेअर्स खरेदी विक्री वर किती चार्जेस लागतात? :-
शेअर्स खरेदी विक्रीमध्ये २ प्रकार आहेत पहिला म्हणजे "इंट्राडे" म्हणजे आजचं खरेदी आणि विक्री करणे आणि दुसरा म्हणजे "डिलिव्हरी घेणे" आज खरेदी करणे आणि उद्या किंवा महिन्याने किंवा वर्षाने विकणे. पहिल्या प्रकारात १०० रुपया मागे ०.०५ पैसे म्हणजे दिवसभरात खरेदी-विक्री मिळून १ लाख रुपयाचा व्यवहार झाला तर ५० रुपये आणि त्यावर सेक्युरिटी ट्रांजॅक्शन टॅक्स, सर्विस टॅक्स पकडून ५५-६० रुपये चार्जेस पडतात . दुसऱ्या प्रकारात १०० रुपया मागे सरासरी ०. ५० पैसे म्हणजे दिवसभरात खरेदी-विक्री मिळून १ लाख रुपयाचा व्यवहार झाला तर ५०० रुपये आणि त्या वर सेक्युरिटी ट्रांजॅक्शन टॅक्स, सर्विस टॅक्स पकडून ५५०-६०० रुपये चार्जेस पडतात . या झालेल्या व्यवहाराचं बिल म्हणजेच "कॉन्ट्रॅक्ट नोट" आपल्याला ब्रोकर कडून मिळणे पुढील २४ तासात मिळणे बंधनकारक असते. त्यामुळे आपला ई-मेल पत्ता ब्रोकरकडे देताना काळजी घ्या आणि आपल्या प्रत्येक व्यवहारानंतर "कॉन्ट्रॅक्ट नोट" तपासात चला.
७. ऑनलाईन की ऑफलाईन ट्रेडिंग :-
आज शेअर बाजारात होणारे ऑनलाईन की ऑफलाईन ट्रेडिंग हे १००% व्यवहार हा ऑनलाईनच होत असतात फरक इतकाच की ऑनलाईन व्यहारामध्ये सर्व सिस्टिम बेस्ड ट्रेडिंग डायरेक्ट होते आणि ऑफलाईन मध्ये आपल्याला ब्रोकर ला कॉल करून किंवा त्याच्या ऑफिसला जाऊन व्यवहार केले जातात. तुम्ही जर स्वतः टेक्नॉलॉजी हाताळण्यात तरबेज असाल तर ऑनलाईन ट्रेडिंग तुम्ही करू शकता.
शेअर बाजार मध्ये गुंतवणुकीचा श्रीगणेशा करण्यासाठी वरील ७ तांत्रिक बाबी समजून घेणे म्हणजे पुढील गुंतवणुकीच्या प्रवासासाठी योग्य तयारी करणे होय. फॉर्म्युला-वनच्या शर्यतीत भाग घेणारा चालक ज्याप्रमाणे शर्यतीत उतरताना आपल्या कारची योग्य तपासणी करतो आणि शर्यतीतही वेळोवेळी कार बाजूला घेऊन तपासणी करून आपल्या शर्यत जिंकण्याकडे लक्ष देतो त्याचप्रमाणे गुंतवणूक करताना या तांत्रिक गोष्टी समजणे अत्यंत गरजेचे आहे.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa